आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरातही अभियंत्याचा राजीनामा, नगरसेवकांच्या मनमानी कारभाराने पालिका अधिकारी त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - प्रत्येक कामात ‘अर्थ’ शोधण्याच्या नगरसेवकांच्या वृत्तीमुळे कोल्हापुरातील महापालिकेतील अधिकारीवर्गही प्रचंड अस्वस्थ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी पालिकेतील जलअभियंता मनीष पवार यांनी राजीनामा दिला आहे.
सात-आठ वर्षापूर्वी कोल्हापूर महापालिकेवर आमदार महादेवराव महाडिक यांची मनपावर एकहाती सत्ता होती. त्या वेळीही नगरसेवकांकडून अधिकार्‍यांना शिव्या देण्यापासून मारहाण करण्यापर्यंतचे प्रकार घडले आहेत.
यानंतर विकासकामे करून दाखवण्याचे गाजर दाखवून कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी महाडिकांचा पराभव करत सत्ता ताब्यात घेतली; परंतु परिस्थिती बदलली नाही. रस्ते विकास प्रकल्पापासून ते होऊ घातलेल्या साडेचारशे कोटींच्या थेट पाणी योजनेपर्यंत सर्वत्रच नगरसेवकांच्या ‘माया’ कमावण्याच्या वृत्तीमुळे अधिकारी त्रस्त झाले आहेत.
रस्ते विकास प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार्‍या अनेक नगरसेवकांनी यामध्ये हात मारल्याची खुली चर्चा असते. यात कोणत्या नेत्याने किती खाल्ले याचीही चर्चा असून या प्रकल्पामध्ये 20 कोटी रुपयांचा वाटा काहींनी लाटल्याची जाहीर टीका आमदार महाडिक यांनी केली होती. थेट पाइपलाइन योजनेतील 450 कोटींच्या टेंडरवरही कारभार्‍यांची नजर आहेत. यातूनच जलअभियंता पवार यांना शिवीगाळ झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते.
अपयशाची मुश्रीफांची कबुली
महापालिकेतील टक्केवारीची कीड रोखण्यात अपयश आल्याची कबुली कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतीच दिली आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर मुश्रीफ यांनी अधिकारी व नगरसेवकांची बैठक घेतली. तेव्हा अधिकार्‍यांना त्रासाबद्दल विचारणा करण्यात आली. मात्र नगरसेवकांसमोर एकही अधिकारी त्यावेळी बोलण्याचे धाडस दाखवू शकला नव्हते.