आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर तृप्ती माळवींचा राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूर महापालिकेची आज महासभा पार पडली. आजच्या सभेत महापौर तृप्ती माळवी राजीनामा देणार का याकडे लक्ष लागले होते. मात्र, माळवींनी राजीनामा न देता सभागृहातून काढता पाय घेतला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्यानंतर बदनामी होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर माळवीं यांच्याकडून 31 जानेवारीलाच राजीनामा लिहून घेतला आहे. महापौर यांचा राजीनामा घेण्यासाठीच आजची महासभा आयोजित केली होती. या सभेला महपौर माळवी स्वत: उपस्थित होत्या. त्यामुळे पक्षाकडे त्यांनी दिलेल्या राजीनाम्याला काहीच किंमत राहिली नाही. माळवी महासभेस गैरहजर राहिल्या असत्या तरच त्यांच्या अनुपस्थितीत नगरसचिवांकडे राजीनामा पत्र देऊन राजीनामा मंजूर करून घेता आला असता. मात्र, माळवी महासभेला हजर राहिल्याने तीही शक्यता संपली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी व पक्षाने आदेश दिल्यानंतरही माळवींनी राजीनामा न दिल्याने त्यांनी पक्षाच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. माळवींनी राजीनामा न दिल्याने त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबत महापालिकेत चर्चा सुरु होती. मात्र महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमनुसार महापौरांवर महासभेत अविश्वास ठराव आणता येत नाही.
दरम्यान, आपण सध्या राजीनामा देण्याच्या स्थितीत नसून पुढील आठवड्याभरात पक्षाच्या आदेशानुसार महासभा घेऊन राजीनामा देणार असल्याचे माळवी यांनी या घडामोडीनंतर सांगितले.