आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर मनपाच्या सर्वसाधारण सभेत अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव ठराव सर्वानुमते मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील हक्कदार पुजारी हटवून या ठिकाणी शासननियुक्त पुजाऱ्यांची नेमणूक करावी, असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी सर्वानुमते मंजुर करण्यात आला आहे. शालिनी सिनेटोन, जयप्रभा स्टुडिओच्या उर्वरित जागेवर कोणत्याही बांधकामास अथवा इतर कोणता व्यवसाय करण्यास महानगरपालिकेने परवानगी देऊ नये, असाही ठराव एकमताने मंजूर झाला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सौ हसीना फरास होत्या तर आयुक्त अभिजित चौधरी देखील सभागृहात उपस्थित होते.
 
 
कोल्हापूर शहरात अनाधिकृत ५६० केबीन्स आहेत. ही अतिक्रमण प्रशासनाने स्वत:च्या अधिकारात हटवावीत. या कारवाईत अडथळा आणणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करा,अशी मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. शहरातील दिव्यांगांना केबीन देण्यात येणार आहेत. मात्र त्यातील काही जागा दिव्यांगानी नाकारल्या होत्या, त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार नवीन जागा निश्चित केल्या आहेत. 
 

या ठिकाणांना मान्यता व्हावी असा ठराव इस्टेट विभागाने सर्वसाधारण सभेसमोर आणला. या विषयाला मंजुरी देण्यास कोणीही हरकत घेतली नाही. पण यापुढे अपंग कल्याण निधीतून केबीन्स न देता आवश्यक साहित्य किंवा रोख अनुदान देण्यात येणार आहे. हे दिव्यांगांना कळविले आहे का? केबीनच्या नवीन जागा निश्चित करताना संबंधित नगरसेवकांना माहिती दिली आहे का? असे सवाल सदस्यांनी उपस्थित केले. भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी, कॉग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह सदस्यांनी शहरात केबीन्स नकोतच अशी भूमिका घेतली.
शहरात तीन महिन्यात ५६० केबीन्स विनापरवाना उभ्या राहिल्या असल्याची माहिती आहे.
 
याबाबत काही सर्व्हे झाला आहे का? झाला असेल अधिकृत आणि अनाधिकृत केबीन्सची माहिती द्या अशी मागणी शिवसेना  नगरसेवक  राहूल चव्हाण यांनी केली. शहरातील संरक्षित वास्तू, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात केबीन्स लावू नयेत, अशी सुचना नगरसेवक तौफीक मुल्लाणी यांनी केली. तर फुटपाथवरच्या केबीन हटवा, असे सभागृह नेते प्रवीण केसरकर यांनी सांगितले. शहरातील अनाधिकृत केबिन, वाढणाऱ्या अतिक्रमणाच्या मुद्यावरून सदस्यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. 
 
 
शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी, शहरातील चारही विभागीय कार्यालयांनी सर्व्हे केला आहे. शहरात ५६० केबीन्स अनाधिकृत आढळल्याचे स्पष्ट केले. त्यांनी ही माहिती दिल्यानंतर सभागृहात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. इतके अतिक्रमण वाढले आहे, तर प्रशासन काय करते? कारवाई का करत नाही? असे सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर सरनोबत यांनी ‘सभागृहात तसा ठराव करावा’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. अतिक्रमण काढण्यासाठी सभागृहात ठराव करण्याची गरज आहे. प्रशासनाच्या अधिकारात अतिक्रमणे काढलीच पाहिजेत, यावर सदस्य ठाम होते. सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही आघाडीच्या सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. तुमचा अधिकार वापरा आणि अतिक्रमणे हटवा, अशी सुचना सदस्यांनी केली. जर कोणी नगरसेवक अतिक्रमण निमूर्लन कारवाई करताना कोणाला पाठीशी घालत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. अनाधिकृत बांधकामांना अभय देणारयांवर अपात्रतेची कारवाई करता येते, तशी कारवाई करा, पण शहर अतिक्रमणमुक्त करा, अशी सुचना ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी केली. त्यावर प्रशासनाने लवकरात लवकर अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

या सभेत महापालिकेच्या शाळांमध्ये विविध खेळांची प्रमाणित मैदाने तयार करण्यासाठी अनुदान मिळावे, शहरात मनपाच्या वतीने अभ्यासिका सुरू करण्यासाठी आराखडा तयार करावा, खासगी ड्रेनेज चोकअप, मैला सक्शन करण्यासाठी खासगी प्लंबर आणि कारागिरांना परवानगी द्यावी, मानधन कर्मचाऱ्यांना किमान वेतन मंजूर करून समान काम किमान वेतन द्यावे, फुलेवाडी येथील जलकुंभाचे नामकरण क्रांतीसिंह नाना पाटीलनगर जलकुंभ परिसर असे करावे, यासह अन्य ठराव मंजूर करण्यात आले.
 
बातम्या आणखी आहेत...