आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhapur Politics News In Marathi, Lok Sabha Election 2014

निवडणुकीचा आखाडा: कोल्हापूरच्या मैदानात लढणार उसने पहिलवान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - कोल्हापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातच नसलेल्या धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर केली आणि दुसरीकडे उभी हयात ज्यांनी पुरोगामित्वाची पाठराखण केली, ते खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी आपले चिरंजीव संजय यांना शिवसेनेचा भगवा खांद्यावर घ्यायला लावून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या या उसन्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढाई होण्याची चिन्हे आहेत. दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीकडून रिंगणात असलेल्या सदाशिव मंडलिक यांनी शिवसेनेचा भगवा घेऊन फिरणार्‍या धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. 2009 च्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीने महाडिक यांना पक्षात घेतले; परंतु ऐनवेळी महाडिक यांच्या ऐवजी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. त्यामुळे स्वाभिमान दुखावल्याचा भावनिक मुद्दा उपस्थित करत मंडलिकांनी शरद पवारांना आव्हान देत अपक्ष उमेदवारी दाखल केली. नवख्या संभाजीराजेंना दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी दगा दिला आणि भावनेच्या लाटेवर स्वार होत मंडलिकांनी विजयर्शी मिळवली. अर्थात, उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेल्या महाडिक गटानेही आपली संपूर्ण यंत्रणा मंडलिकांच्या विजयासाठी राबवली होती.

महाडिक : पक्षनेत्यांकडून प्रामाणिक पाठिंब्याची गरज
धनंजय महाडिक यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुo्रीफ आणि दोन आमदार ही त्यांची जमेची बाजू आहे. आमदार महादेवराव महाडिक यांना मानणारा वर्ग मोठा आहे. सत्ता हातात नसताना पंधरा वर्षे त्यांनी लोकोपयोगी उपक्रम राबवले. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी जर प्रामाणिकपणे मदत केली तर महाडिक विजयापर्यंत जाऊ शकतात; परंतु गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी त्यांचे असलेले वितुष्ट संपणार का, हा औत्सुक्याचा विषय आहे.

मंडलिक : नाराज नेत्यांच्या मदतीवर यंदाही मदार
या मतदारसंघात मंडलिक यांना मानणार मोठा गट आहे. पक्षापेक्षा मंडलिकांना तो मानतो. शिवसेना- भाजप युतीची येथे दोन ते सव्वादोन लाख मते आहेत. स्वाभिमानी आणि रिपाइंची मते महायुतीमुळे मंडलिकांच्या पारड्यात पडतील. चार वेळा खासदार, तीनदा आमदार, मंत्रीपद, साखर कारखाना आणि भावनिक राजकारण करण्यात मंडलिकांचे कार्यकर्ते माहीर आहेत. तसेच जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसमधील महाडिकविरोधी नेते मंडलिक यांना मदत करण्याचीच जास्त शक्यता आहे.