आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंदीरमामाने लांबवले साडेचार हजार रुपये; सीसीटीव्हीमध्ये चोरी कैद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - दुकानाच्या कपाटात ठेवलेले साडेचार हजार रुपये चोरीला गेल्याने मालक हवालदिल झाले. बाहेरून दुकान बंद असताना चोरी कशी झाली या विवंचनेत पडले. मग त्यांनी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा आधार घेतला आणि चक्क उंदरानेच साडेचार हजार रुपये चोरल्याचे उघडकीस आले. अशी आगळीवेगळी घटना घडली आहे कोल्हापूरजवळील गांधीनगर परिसरात.
कोल्हापूरहून गांधीनगरकडे जाताना राष्ट्रीय महामार्गाजवळ अनंत तनवाणी यांचे देशी-विदेशी मद्याचे दुकान आहे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद करून जाताना काही रक्कम बरोबर घेतली व साडेचार हजार रुपये मोजून कपाटात ठेवले. दुकान बंद केले व ते निघून गेले. दुसर्‍या दिवशी ते दुकानात आले तर कपाटाचे दार उघडे. आत पैसेही नाहीत. बाहेरचे दार बंद असताना आतून पैसे कसे गेले याचे त्यांना आश्चर्य वाटले. अखेर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा आधार घेतला आणि मुशकराजांचा कारनामा समजला.

दोन तासांत नोटा पळवल्या
तनवाणी रात्री ते कपाट उघडेच ठेवून गेले होते. त्यामुळे पहाटे पावणेचारच्या सुमारास एक उंदीर कपाटात शिरला. त्याने एक नोट तोंडात धरली आणि ती याच दुकानात असलेल्या ग्रीलच्या पलीकडे टाकली.
एकापाठोपाठ दोन तासांत उंदराने अशाच पद्धतीने कपाटातून नोटा बाहेर नेल्या. त्यानंतर तनवाणी यांनी पाहिले तर सर्वच्या सर्व नोटा त्यांना तिथे सापडल्या. एक-दोन नोटा उंदराने कुरतडल्या होत्या. परंतु ज्या पद्धतीने उंदराने दोन तासात या नोटा कपाटाबाहेर आणल्या ते पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. या घटनेमुळे मात्र अनेकांचे चांगलेच मनोरंजन झाले.

उंदीरमामा झाले बेघर
गेल्या अनेक दिवसांपासून उंदराचे या दुकानात वास्तव्य होते. सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानात ठेवलेल्या अनेक वस्तूंची तो नासधूस करत होता. मात्र, अनेक उपाय करूनही तो काही केल्या सापडत नव्हता. पैसे गायब होण्याचे निमित्त झाले आणि तनवाणी यांनी दुकानातील सीसीटीव्ही पाहिला. त्यात उंदीरमामा कैद झाले. त्यानंतर तनवाणी यांनी सर्व दुकान खाली करून मुशकराजांना लांब बाहेर फेकून दिले.