आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरच्या टोलला १५ दिवसांची स्थगिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - काेल्हापुरात आयआरबी कंपनीकडून सुरू असलेल्या टोल वसुलीला १५ दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे आणि टोलविरोधी कृती समितीचे पदाधिकारी यांच्यासमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या टाेलबाबत महिनाभरात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
गेली ५ वर्षे टोलचा प्रश्न कोल्हापुरात धुमसत असून कोणत्याही परिस्थितीत टोल न देण्याची भूमिका येथील कृती समितीने घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत फार मोठा संघर्ष या टोलच्या निमित्ताने निर्माण झाला होता. हिंसक पातळीवरही अांदाेलने झाली. २२० कोटी रुपयांचा हा प्रकल्प ४५० कोटी रुपयांवर गेल्याचा दावा आयआरबी कंपनीने केला हाेता. मात्र याबाबत नेमण्यात आलेल्या मूल्यांकन समितीने २३९ कोटी ५६ लाख रुपये प्रत्यक्षात खर्च झाल्याचा अहवाल तयार केला आहे. मात्र याविरोधात आयआरबी कंपनी न्यायालयात गेली आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना हा प्रश्न पुन्हा तापला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरचेच असल्याने त्यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे.
अशातच या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सर्व प्रश्नांबाबत चर्चा होऊन आयआरबीला नेमके किती पैसे द्यायचे आणि ते कसे द्यायचे याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. तूर्त १५ दिवसांची टोलवसुलीला स्थगिती देण्यात आली आहे.
कोल्हापूरकरांना टोलमुक्ती आहेच : स्थगितीचा हा निर्णय झाला आहे तो कोल्हापुरात बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांसाठी उपयुक्त ठरला आहे. कारण सुरुवातीपासूनच कोल्हापूर पासिंगच्या गाड्यांचा टोल कुणीही देत नाही आणि आता आयआरबीनेही एमएच- ०९ पासिंगच्या गाड्यांकडून टोलवसुली बंदच केली आहे. स्थानिक गाड्यांना टोलवसुलीतून कायमचे वगळण्याचा प्रस्ताव शासनाने दिला होता. मात्र टोलविरोधी कृती समितीने हा प्रस्ताव नाकारून संपूर्ण टोलमुक्तीची मागणी केली आहे.