आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात टोलविरोधी मोर्चा, जनता पुन्हा रस्त्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- आयआरबी कंपनीच्या टोलवसुलीविरोधात कोल्हापूरकर सोमवारी तिसर्‍यांदा रस्त्यावर उतरले. ‘देणार नाही, देणार नाही, अजिबात टोल देणार नाही,’ अशा घोषणा देत हजारो नागरिकांनी गांधी मैदानातून काढलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
दुपारी 12 च्या सुमारास गांधी मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली. सर्वपक्षीय मोर्चा असल्याने सर्व पक्षांचे झेंडे घेतलेल्या उत्साही कार्यकर्त्यांनी चांगलीच वातावरणनिर्मिती केली होती. या वेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

गांधी मैदान, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, मनपा चौकातून मोर्चा दसरा चौकात आला. येथे वकील वर्गही मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी झाला. महापौर सुनीता राऊत लाटण्यासह या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात आला. या ठिकाणी कॉ. गोविंद पानसरे, एन. डी. पाटील यांची भाषणे झाली. यानंतर ताराराणी सभागृहात झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलिसप्रमुख मनोजकुमार शर्मा, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी प्रशासनाची बाजू मांडली. बिदरी बोलताना मात्र समितीचे पदाधिकारी व त्यांची शाब्दिक चकमक उडाली.

चर्चेअंती कोणत्याही परिस्थितीत आम्ही टोल देणार नसल्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. आयआरबीने पोलिसांची सोय करताना बांधलेले शेड विनापरवाना का उभे करू दिले, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला.

कोल्हापुरी पायताण, बैल
या मोर्चात एका टेम्पोवर भव्य कोल्हापुरी पायताण उभे करण्यात आले होते. तसेच ‘निष्क्रिय मुख्यमंत्री’ अशी झूल पांघरलेला बैलही काही जणांनी मोर्चामध्ये आणला होता. आमदार महाडिक यांनी या बैलाजवळ उभे राहून छायाचित्रकारांना पोझ दिली.
टोलवसुली करणार्‍या आयआरबी कंपनीच्या विरोधात सोमवारी कोल्हापूरकरांनी शहरातून भव्य मोर्चा काढला होता.