आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली: कृष्णा नदीकाठी मगरीची आठ पिल्ले मृतावस्थेत: हत्या केल्याचा संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
सांगली - कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या मगरींच्या अस्तित्वावरच लोकांनी घाव घालायला सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे बुधवारी मगरीची ८ पिल्ले मृतावस्थेत सापडली. त्यांची हत्या केली असल्याचे प्राथमिक तपासणीनंतर स्पष्ट झाले.
कृष्णा नदीपात्रात भिलवडीपासून सांगली शहरापर्यंत मगरींचे अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे. याची मच्छीमारांना कल्पना आहे. त्यामुळे मच्छीमार आणि मगरींचा कधीच संघर्ष झाला नाही. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये शेतकरी नदीतून थेट पाणी उपसा करू लागल्यापासून आणि वाळू उपसा वाढल्यापासून मगरींची अाश्रयस्थाने धोक्यात आली आहेत. त्यातून मगरींनी माणसावर हल्ला केल्याच्या घटना गेल्या एक- दोन वर्षांत वाढल्या आहेत. सांगली शहराजवळच्या नदीपात्रात यापूर्वी कधीही मगरींचे दर्शन झाले नव्हते. मात्र, गेल्या वर्षी शहरापासून एक-दोन किलाेमीटर अंतरावर वाळू उपसा सुरू झाल्यामुळे बिथरलेल्या मगरी शहराजवळच्या पात्रात दिसू लागल्या अाहेत.

या वर्षी भिलवडी, डिग्रज या ठिकाणी मगरींनी हल्ला करून दोघांना ठार केले, तर पाच ते सहा जण जखमी झाले. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी मगरींचे अन्यत्र पुनर्वसन करावे म्हणून वन विभागाकडे अनेकदा मागणी केली. त्यानुसार वन विभागाने गेल्या महिन्यात सर्वेक्षण
केले होते.

बुधवारी भिलवडी गावाजवळच्या नदीपात्रालगतच्या शेतात काही जणांना मगरीची ८ ते १० पिल्ले मृतावस्थेत आढळली. त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली. उपविभागीय वनाधिकारी समाधान चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतावस्थेतील ८ पिल्ले ताब्यात घेतली. कोणीतरी या पिल्लांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी नदीकाठच्या गावांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण अाले अाहे.
मृतांची संख्या वाढणार?
कृष्णा नदीपात्रातील आणखीही काही पिल्ले मारली असल्याचा संशय आहे. मात्र, या पिल्लांपासून काही अंतरावर नदीपात्रात मादी मगर ठाण मांडून बसली असल्याने त्याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. वन विभागाचे कर्मचारी याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...