आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानडी पोलिसांची दंडेली, रावतेंना सीमेवरच रोखले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - शिवसेनेचे नेते आमदार दिवाकर रावते यांची बेळगावला सुरू होणारी पत्रकार परिषद कर्नाटक पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रोखली. त्यांना येळ्ळूरला जाण्यापासून मज्जाव करण्यात आलाच, शिवाय पोलिसांच्या गाड्या अक्षरश: मागे लावून शहराबाहेर काढण्यात आले. त्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक शासनाची अंत्ययात्रा काढली, कोल्हापूरातही बंद पाळण्यात आला.

येळ्ळूर येथील मराठी भाषकांची विचारपूस करण्यासाठी आमदार रावते, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख विजय देवणे बेळगावला गेले होते. त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती, परंतु पोलिसांनी रावते यांना पत्रकार परिषद घेता येणार नाही, असे सुनावले. यावेळी पोलिस अधिकारी आणि रावते यांच्या शाब्दिक चकमक झाली, परंतु पोलिसांनी काहीही ऐकून न घेता या सर्वांना तेथून बाहेर काढले. कोणत्याही परिस्थितीत शिवसैनिकांना येळळूर येथे जाऊ द्यायचे नाही असे कर्नाटक पोलिसांनी ठरवले होते. त्यामुळे पोलिसांनी शिवसेना नेत्यांच्या कारच्या ताफ्याच्या मागे आपल्या गाड्या लावल्या व त्यांना शहराबाहेर काढले.

ताफ्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात कर्नाटक पोलिसांच्या एका गाडीला अपघातही झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी दोन्ही राज्यांच्या सीमेवर चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे कर्नाटक शासनाची अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, प्रा. सुनिल शिंत्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सुप्रीम कोर्ट संतप्त
नवी दिल्ली - येळ्ळूरमध्ये मराठी भाषकांना कानडी पोलिसांच्या मारहाणीची छायाचित्रे सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखालील पीठाला शुक्रवारी दाखवण्यात आली. त्यावर ‘एखादे सरकार असे वागत असेल तर त्यापेक्षा गंभीर काहीही असू शकत नाही’, अशा शब्दांत पीठाने संताप व्यक्त केला. दरम्यान, कर्नाटकच्या याचिकेवर महाराष्ट्राला नोटीस बजावण्यात आली.