आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard Strays Into MP's Bungalow, Dies After Capture

खासदाराच्या बंगल्यात बिबट्या घुसला; कोल्हापुरात चार तास थरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - खासदार धनंजय महाडिक यांच्या रुईकर कॉलनीतील बंगला आणि परिसरात बिबट्याने चार तास धुमाकूळ घातला. त्याला पकडण्यासाठी आणि पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने बिबट्याने तिघांना चावा घेतला. वन विभागातील पथकाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले असले, तरी चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी जात असताना मात्र त्याचा मृत्यू झाला.

गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास महाडिक यांच्या बंगल्यातील कुत्र्यांनी जोरजोराने भुंकण्यास सुरुवात केली. या कुत्र्यांच्या प्रशिक्षकाने तिकडे धाव घेतली असता त्याला कंपाउंडबाहेर बिबट्या दिसला. त्याने तातडीने महाडिक यांना याबाबत माहिती दिली. खासदारांनी पोलिस, वनखात्याच्या अधिकार्‍यांना बोलावून घेतले. मात्र ही यंत्रणा पोहोचण्याआधीच महाडिक यांनी माकडवाला वसाहतीतील युवकांना बोलावले. काही वेळातच पन्नास तरुण जाळ्या घेऊन धावले.

अग्निशमन दल, वनखात्याचे कर्मचारी, पोलिस, मदतीला आलेले युवक आणि बघ्यांची गर्दी त्यामुळे बिबट्या बिथरला. त्याने महाडिकांच्या बंगल्याशेजारील देशपांडे यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न केला. तसेच शेजारी असणार्‍या झाडीतही आसरा घेतला. एका रिकाम्या खोलीतही तो काही काळ बसून होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला की तो अंगावर येत असे. त्याच्या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले. अखेर अंगावर जाळी टाकून त्याला अडकवण्यात आले.

महाडिकांनी काढली बंदूक
बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठीची बंदूक वनखात्याकडे नव्हती. ती सांगलीहून मागवण्यात आली. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी जाळीही नव्हती. खुद्द खासदार महाडिक यांनीच याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच नागरिकांच्या जीविताला धोका नको म्हणून मी स्वत: रिव्हॉल्व्हर आणि माझा मुलगा बंदूक घेऊन तैनात होतो, असे महाडिक यांनी सांगितले.

दुखापतीमुळे मृत्यू
पकडलेल्या बिबट्याला एका टेम्पोतून वनखात्याच्या कर्मचार्‍यांनी नेले. त्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी नेले जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. कोणत्याही शास्त्रीय पद्धतीने बिबट्याला पकडता आले नाही. पकडताना गंभीर दुखापती झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.