सांगली - देशाला कायमचे दुष्काळमुक्त करायचे असेल, तर नदीला नदी जोडण्यापेक्षा नद्या जलस्रोतांशी जोडल्या पाहिजेत, असे मत जलबिरादरीचे प्रवर्तक डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदी पुनरुज्जीवित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कार्यकर्त्यांचा प्रशासनाच्या वतीने डॉ. राणा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. राणा म्हणाले, ‘सामाजिक कार्यकर्त्यांचा शासन-प्रशासनावर विश्वास राहिला नाही. मात्र, सांगलीचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी यांनी दोन वर्षांतील दुष्काळात जिल्ह्यात ज्या पद्धतीने काम केले, ते पाहिल्यावर प्रशासन आणि लोक सहभागातून किती चांगले काम करता येऊ शकते, हे स्पष्ट होते.
लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी प्रशासन आणि लोकांचे असे हातात हात घालून काम करणे निश्चितच प्रभावी ठरेल. अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन करण्यात लोक सहभागाचे जेवढे योगदान आहे, तेवढेच प्रशासनाचेही आहे. अग्रणी नदीच्या या पुनरुज्जीवनाची यशोगाथा पुस्तक स्वरूपात समोर यायला हवी.’
तर दुष्काळ येणार नाही
‘समाजाला नदीशी जोडण्याचे काम व्हायला हवे, असे मी नेहमी म्हणत आलो आहे; पण आज मी म्हणेन की, भारताला पूर आणि दुष्काळापासून कायमची मुक्ती द्यायची असेल, तर आपल्या नद्या तलावांसारख्या जलस्रोतांशी जोडायला हव्यात. ज्यामुळे ना पूर येईल, ना दुष्काळाचा सामना लोकांना करावा लागेल. नद्या केवळ पुनरुज्जीवित करून प्रश्न सुटणार नाहीत. आता वाहत्या केलेल्या नद्या कायमच वाहत्या ठेवाव्या लागणार आहेत. त्यासाठी नदीच्या पात्रात होणारी अतिक्रमणे थांबवावी लागतील.
जिल्ह्यातील बोअरवेलचे पुनर्भरण व्हावे
‘‘सांगली जिल्ह्यात अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन आता झाले आहे. आता जिल्ह्यातील बोअरवेलचे पुनर्भरण करण्याचे काम हाती घ्या. त्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासनाची एक समिती नेमा,’’ अशी सूचना राजेंद्रसिंह राणा यांनी केली.