आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडवाणींची ‘आणीबाणी’ गांभीर्याने घ्यायला हवी, शरद पवार यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘लालकृष्ण अडवाणी यांनी यापूर्वी देशात लागलेल्या आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला आहे. आणीबाणी काय असते हे ते चांगले जाणतात. त्यामुळे त्यांनी नुकतेच पुन्हा आणीबाणीचा धोका असल्याचे केलेले वक्तव्य देशाने गांभीर्याने घ्यायला हवे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.

तासगाव तालुक्यातील अंजनी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छगन भुजबळ यांच्या मालमत्तेच्या चौकशीबाबत बोलताना पवार म्हणाले, ‘मीही गृहमंत्री म्हणून काम केले आहे. माझ्या माहितीनुसार कोणत्याही प्रकरणाची चौकशी करणार्‍या यंत्रणेने चौकशी पूर्ण होईपर्यंत जाहीरपणे काही बोलू नये, असे संकेत आहेत. पण सध्या या अधिकार्‍यांना जाहीरपणे बोलण्यातच अधिक रस दिसतो आहे, हे योग्य नाही,’ असा टाेलाही त्यांनी ‘एसीबी’ला लगावला.

बिहारच्या निवडणुका काँग्रेस, लालूप्रसाद, नितीशकुमार यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढवण्याचे ठरवले आहे. येत्या आठवड्यात तेथे होत असलेल्या विधान परिषदेच्या २४ जागांच्या निवडणुकीसाठी लालूप्रसाद यांना १०, नितीशकुमार यांना १०, काॅंग्रेसला ३ आणि राष्ट्रवादीला एक अशा जागा मिळण्याबाबत बाेलणीही झाली आहे. भाजपला बाजूलाच ठेवावे, असे तेथील जनमत आहे. त्यासाठी आम्ही ती निवडणूक एकत्रित लढणार आहाेत, असे पवारांनी स्पष्ट केले.

साखर कारखान्यांचे पॅकेज फसवे
केंद्र शासनाने साखर कारखान्यांना ६ हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज देऊ केले आहे. हे पॅकेज फसवे असल्याचे सांगताना पवार म्हणाले, ‘आम्ही पाच वर्षांच्या काळासाठी कारखान्यांना कर्ज दिले होते. त्याचे व्याज त्या वेळी केंद्र सरकारने भरले होते. आता जाहीर केलेले कर्ज कारखान्यांना मिळायला आणखी ८ महिन्यांचा कालावधी लागेल. शिवाय चार महिन्यांचे कर्ज कारखान्यांना भरावे लागेल. त्यामुळे या पॅकेजचा फायदा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना होणार नाही.’