आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर - रविवारी दुपारची वेळ... छोट्याशा गावातील ग्रामस्थांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या.... सव्वा बाराच्या दरम्यान घरघर ऐकू येऊ लागली. काही मिनिटांमध्ये पांढरेशुभ्र हेलिकॉप्टर आकाशात दिसू लागले. काही वेळातच हेलिकॉप्टर खाली उतरले आणि यामधून गणेश मंडळाचे कार्यकर्ते चक्क श्रीची मूर्ती घेऊन उतरले. सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते, त्यातच ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर सुरू झाला.
राष्ट्रवादीचे नेते व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघातील उंदरवाडी (जि. कोल्हापूर) हे छोटंसं गाव. या गावात एसटीही जात नाही. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मारूती पाटील हे दरवर्षी गणेशोत्सवात नवीन कल्पना राबवितात. त्यांच्या बेलजाई तरूण मंडळाने गतवर्षी हत्तीवरून गणपतीची मूर्ती आणली होती. त्याचवेळी पाटील यांनी पुढच्या वर्षी मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने हेलिकॉप्टरमधून बाप्पा आणू, अशी घोषणा केली होती. साहजिकच मंत्री मुश्रीफ यांनी आपला सहकार्यांना ‘मदतीचा हात’ दिला अन् रविवारी उंदरवाडीच्या माळावर हेलिकॉप्टर उतरले. बिद्री साखर कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे, मारूती पाटील आणि युवा नेते नाविद मुश्रीफ हे पुण्याहून ही मूर्ती घेऊन आले होते.
हेलिकॉप्टर गावात येताच ग्रामस्थांनी ‘गणपती बाप्पाचा जयजयकार सुरू केला. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी पंचक्रोशीतून शेकडोजण या ठिकाणी आले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.