आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमार्फत करण्यात येणारे जनआक्रोश आंदोलन हे नैराश्यातून; मधु चव्हाण यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- काँग्रेसमार्फत करण्यात येणारे जनआक्रोश आंदोलन हे नैराश्यातून आहे. काँग्रेसने स्वतःच त्यांच्या निराशाजनक कामगिरीबद्दल जनआक्रोश करावा आणि मंदिरात जावून पापक्षालन करावे असा सल्ला  भाजपचे प्रदेश प्रवक्ते मधु चव्हाण यांनी दिला आहे.
 
काही प्रसारमाध्यमे भाजप द्वेषी असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. मधु चव्हाण म्हणाले, भाजप सरकारने मागील तीन वर्षात अनेक सकारात्मक कामे केली. तर कर्जमाफी, कॅशलेस व्यवहार आणि नोटबंदी यावर काँग्रेसने कितीही आदळआपट केली तरी समाजाचा व्यवहार पारदर्शी करणारे ते नावीन्यपूर्ण उपक्रम आहेत. आपली पत्रकार परिषद म्हणजे भाजपच्या जनसंवादाचा अभिनव उपक्रम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय जनता पक्षाने आपल्या सत्तेच्या काळात सादर केलेले अर्थसंकल्प हे शेतीच्या विकासाला पुरक आहेत.शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी जरी उशिरा झाली असली तरी शेतीच्या क्षेत्राची अट न घालता सर्वांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. या कर्जमाफीतून बॅंकांची बोगस कर्जप्रकरणे उघडी पडली आणि पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ देण्यात आला. शिवाय शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरू करून प्रलंबित वीज जोडण्या, वीज पंपाच्या जोडण्या आणि तसेच जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी अशा प्रकारे शेती विकासास पूरक योजना राबवून शेती उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे. हवामान अंदाज घेणारी 1600 केंद्रे नव्याने कार्यान्वित केली. बाजार समितीत प्रत्यक्ष शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार दिला आहे.

या शिवाय नदीच्या पात्रातून, धरणातून, समुद्रातून गाळ काढून नद्यांचा प्रवाह आणि त्यांची साठवण क्षमता वाढविली आहे. या शिवाय समुद्रातील गाळ काढुन समुद्री वाहतूक मार्गी लावण्याचे काम केले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 384 जिल्ह्यांनी आदर्शवत कामगिरी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, जातपडताळणी सुलभ करण्याबरोबरच ओबीसी मंत्रालय सुरू केल्याची माहिती दिली. या वेळी चव्हाण यांनी सर्व विभागातील भाजप सरकारने कामे केल्याचे आकडेवारी दिली. या पत्रकार परिषदेला भाजपचे  जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर, आ. अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, गोकुळ दुध संघाचे संचालक बाबा देसाई आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...