आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhuri Not Take Sin To Broken Prilgrim Place Tradition, Vinay Kore Urged

देवस्थानाची परंपरा मोडण्याचे पाप माधुरीने करू नये,सुंदर हत्तीप्रकरणी कोरे यांचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - सुंदर हत्तीचे जुने फोटो दाखवून ‘पेटा’ संघटना गैरसमज निर्माण करत आहे. हा हत्ती सध्या वारणानगर येथे उत्तम स्थितीत असल्याने त्याला हलवण्यात येऊ नये, अशी याचिका माजी मंत्री व आमदार विनय कोरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच जोतिबा देवस्थानची हत्तीची परंपरा खंडित करण्याचे पाप अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जोतिबा देवस्थानाला वारणा उद्योग समूहाने दिलेल्या सुंदर हत्तीबाबत गेले वर्षभर पेटा संघटनेकडून आक्षेप घेतले जात आहेत. सुंदर हत्तीला बंगळुरू येथील पुनर्वसन केंद्रात हलवण्याबाबत उच्च न्यायालयाने वन खात्याला आदेश दिला आहे.
या पाश्र्वभूमीवर आता आमदार विनय कोरे यांनी सुंदरला हलवू नये यासाठी याचिका दाखल केली असून याविषयीच्या दोन्ही याचिकांची सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.
वारणानगरला येऊन पाहणी करा : याबाबत कोरे यांनी सांगितले की, मुळात सुंदर हे अरुणाचल प्रदेशातील हत्तीचे पिलू असून ते जन्मापासून जंगलात नव्हतेच. जोतिबा देवस्थानाला हे पिलू दिल्यानंतर काही वर्षांत माहूत सोडून गेल्याने गोंधळ झाला; परंतु आता वारणानगर येथे सुंदरची उत्तम व्यवस्था ठेवण्यात येत आहे. ‘पेटा’ने सुंदरचे जुने फोटो दाखवून सहानुभूतीचे वातावरण निर्माण केले आहे. एवढीच काळजी असेल तर हॉलिवूडच्या अभिनेत्री पामेला बोर्डेस आणि माधुरी दीक्षित यांनी वारणानगर येथे येऊन सुंदर हत्तीची सध्याची स्थिती पाहावी आणि मगच मते व्यक्त करावीत.
जोतिबावर 40 एकर जागा हत्तीसाठी : केंद्र सरकारने महाराष्ट्रात एकमेव हत्तीसाठी आरक्षित पार्क विकसित करण्यासाठी मंजुरी दिली असून जोतिबा डोंगरावर 40 एकरमध्ये हे पार्क असेल. तेथे सुंदरला ठेवण्यात येणार आहे. दैनंदिन खर्च वारणा उद्योग समूह करत आहे. चांगला माहूत मिळाल्याने हत्ती सुंदर आता उत्तम पद्धतीने वास्तव्य करत असून जोतिबाच्या भाविकांचीही सुंदर येथे राहावा, अशी इच्छा असल्याचे कोरे म्हणाले.
देवाला बांधून ठेवतात का?
‘हत्तीच्या रूपात आपण गणेशाला पाहत असतो. अशा या देवाला बांधून ठेवतात का? या हत्तीला सोडण्यासाठी आपण सकारात्मक विचार कराल, अशी आशा आहे. त्याला सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याची जबाबदारी ‘पेटा’ संस्था घेईल. याबाबत ‘पेटा’च्या माध्यमातून आमच्याशी संपर्कही साधू शकता,’ असे आवाहन करणारे पत्र माधुरी दीक्षित व तिचा पती डॉ. श्रीराम नेने यांनी कोरेंना पाठवले होते.