आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे कोल्हापूर अधिवेशन सुरू; राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, फडणवीस दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांचे कोल्हापुरात आगमन झाले आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता या अधिवेशनाचे उदघाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची वर्षपूर्ती आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे पूर्ण झालेले सात महिने याबद्दल दोन्ही सरकारांचे अभिनंदन आणि पक्षाची राज्यातील ध्येयधोरणे या अधिवेशनामध्ये ठरवण्यात येणार आहेत.

सरकार, संघटना आणि राज्यातील जनता यांच्याबाबत एकत्रित विचार करण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रामध्ये भाजपचे सरकार आल्यानंतरचे हे पहिले अधिवेशन होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शनिवारी अमित शहा यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद््घाटन झाल्यानंतर केंद्र शासनाच्या अभिनंदनाचा ठराव आशिष शेलार मांडतील आणि राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अनुमोदन देतील. यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व पीयूष गोयल हे केंद्र शासनाच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतील. राज्याच्या कामगिरीबाबत अतुल भातखळकर मांडणी करतील आणि त्यानंतर महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे घेतलेल्या निर्णयांबाबत माहिती देतील. या अधिवेशनासाठी राज्यभरातून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही शहरात दाखल झाले आहेत. पक्षाच्या पदाधिकार्‍यांत कामकाजाबाबत मोठी उत्सुकता आहे.

निम्म्या मंत्रिमंडळाचा तीन दिवस कोल्हापुरात मुक्काम
अधिवेशनाचे उद््घाटन शनिवारी होणार असले, तरी आज सायंकाळी येथील रेसिडेन्सी क्लबवर कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. या वेळी पक्षाचे राज्याचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे, आशिष शेलार, प्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्ये यांच्यासह अनेक अन्य पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. रात्री उशिरा अमित शहा हेदेखील या चर्चेत सहभागी झाले.

गुळाची ढेप आणि कोल्हापुरी चप्पल
येणार्‍या १५०० प्रतिनिधींना उद््घाटनाआधी गुळाची ढेप आणि कोल्हापुरी चप्पल भेट म्हणून देण्यात येणार आहेत. तसेच महालक्ष्मीच्या मंदिरात सर्व मंत्री दर्शनासाठी गेल्यानंतर त्यांनाही स्वतंत्र प्रसाद देण्याची श्रीपूजकांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे.