आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युती तुटली म्हणूनच खरी ताकद कळली - मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोपीनाथ मुंडे नगरी (कोल्हापूर) - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबतची युती तुटेल, असे वाटले नव्हते; पण आमच्यावर तशी वेळ आली. तीन दिवसांत २८८ जागांवर उमेदवार उभे करावे लागले. मोदी सरकारवरील विश्वास जनतेने आमच्यावरही दाखवला आणि भाजप गेल्या ३० वर्षांत राज्यातील १०० पेक्षा जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरला. पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळ दिल्यानेच विजय मिळाला. युती तुटली नसती तर आम्हाला आमची ताकदच कळली नसती, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शिवसेनेला टोला लगावला.

भाजपच्या राज्य अधिवेशनात मुख्यमंत्री बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या हस्ते दोन दिवसांच्या अधिवेशनाचे उद‌््घाटन झाले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, हंसराज अहिर, प्रकाश जावडेकर, एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गिरीश बापट या मंत्र्यांसह खासदार, आमदार, राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. रविवारी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे.
पाच वर्षे सत्ता आमचीच
राज्यातील भाजपची सत्ता जावी म्हणून अनेक जण देव पाण्यात घालून बसले आहेत; पण पुढील पाच वर्षेच नव्हे तर त्यापुढील पाच वर्षेही राज्यात भाजपचीच सत्ता असेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सरकार मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंतच टिकेल, असे भाकीत केले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले.
बँकाही ताब्यात घेऊ : दानवे
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने प्रत्येक निवडणुकीत यश मिळवले. केंद्र सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना निकष बदलून मदत दिली; पण ही मदत ज्या बँकांत जमा झाली, त्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ती मिळायला विलंब झाला. आता या बँकाही आपण ताब्यात घेऊ या म्हणजे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही.
टार्गेट शिवसेनाच : या अधिवेशनात मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत सर्वांचेच सुप्त टार्गेट शिवसेनाच राहिले. शिवसेनेची आता भाजपला गरज उरली नसल्याचा सूरही नेत्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसत होता.

(पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, काय म्हणाले अमित शहा)