आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजासाठी जमीन देण्यास मंत्री पाटील यांची असमर्थता, म्हणाले- मराठे हवी तेवढी जागा विकत घेऊ शकतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - मराठा महासंघाच्या वतीने आयोजित मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक भवन मध्ये पहिली आमसभा रविवारी झाली. या आमसभेच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. समाजाच्या वतीने समाज भवानासाठी जागेची मागणी यावेळी मान्यवरांनी केली. राज्याचे महसुलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र शासनातर्फे जमीन देण्यास असमर्थता दर्शवली. चंद्रकांत पाटील म्हणाले, 'शासकीय कामाऐवजी इतर कामांसाठी जमीन देण्याचे प्रमाण कमी झाले आहे.' 
 
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविकामध्ये मराठा समाजाच्या आरक्षण लढाईचा आढावा घेतला.  तसेच मराठा समाजाला का आरक्षण गरजेचे आहे याचे विवेचन केले. मराठाभवन साठी जागा पाहीजे अशी मागणी ही त्यांनी केली.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 
 
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार छत्रपती संभाजीराजे, धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील, ज्येष्ठ इतिहासतज्ञ वसंतराव मोरे उपस्थित होते. 
 
मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे म्हणाले, सद्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन लढ्यामध्यये अडकला आहे. न्यायालयामध्ये तलवार चालत नाही. आरक्षणाबाबत मंगळवार (दि. 2) मे रोजी  सुनावणी होणार आहे. मराठा समाजाला घटनात्मक वैद्य व गुणवत्तेवर टिकणारे आरक्षण पाहिजे. आरक्षण हे केवळ साधन असले पाहिजे. आरक्षणा व्यतीरिक्त ही प्रगती करा. इतर समाजांप्रमाणे स्वताचे मुल्यमापन करुन प्रगती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, आरक्षणाप्रमाणेच स्त्री भ्रुण हत्येचा प्रश्‍नही महत्वाचा आहे. प्रत्येक गावात, शहरात गर्भवती महिलांनी दवाखान्यासोबतच पोलीस ठाण्यात नोंदणी करणे आवश्यक करावे. तीन महिन्यानंतर पोलीस ठाण्यातील महिला कर्मचार्‍यांनी त्या गर्भवती महिलांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करुन पडताळणी करावी म्हणजे स्त्री भ्रुण हत्येचा घटनांवर आळा बसेल असे मत व्यक्त केले. केंद्र शासनाने ओबीसी आयोग स्थापन्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मराठा समाजाला समाविष्ठ करण्यासाठी संभाजीराजेंच्या मदतीने नक्कीच प्रयत्न करु असे आश्‍वासन खासदार महाडिक यांनी दिले. तसेच मराठा भवनसाठी खासदार महाडिक यांच्याकडून 10 लाख तर आमदार अमल महाडिक व महादेवराव महाडिक यांच्याकडून 11 लाख असे महाडिक परिवाराकडून 21 लाख रुपये देत असल्याची घोषणा केली.
खासदार संभाजीराजे म्हणाले, मराठा भवन हे केवळ मराठा समाजासाठी नसून ते बहुजनांसाठी होणार आहे.यामध्ये अत्याधुनिक ग्रंथालय, विज्ञान केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्राचा समावेश आहे. मराठा भवनासाठी सरकारने जमिन द्यावी असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले. तसेच पुढील सभा मराठा भवनच्या पायाभरणीच्या निमीत्ताने घेवू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्‍नी खासदार धनंजय महाडिक यांच्या मदतीने दिल्ली दरबारी प्रयत्न करु असे सांगीतले.
 
आमदार सतेज पाटील यांनी मराठा भवनाला एक रुपयाही कमी पडू देणार नाही असे आश्‍वासन दिले. संभाजीनगर येथील आयटी पार्क नजीक असणारी 6 एकर जागा मराठा भवनासाठी नियोजीत केली आहे. याबाबतची फाईल विभागीय आयुक्तांकडे आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मनावर घेवून ही जागा मराठा भवनसाठी देण्यास प्रयत्न करावे असे सांगीतले. तसेच या प्रश्‍नी सर्वपक्षीय आमदारांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा विचार व्यक्त केला. 
 
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, आदर्श घोटाळ्यानंतर शासकीय कामाव्यतिरीक्त अन्य कारणांसाठी शासनाच्या वतीने जमीन देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मराठा समाजाच्या भवनासाठी जागा दिली तर यास भविष्यात अडचण निर्माण होवू शकते. यापेक्षा मराठा समाजाकडे निधीचा ओघ मोठ्या प्रमाणात आहे. आवश्यक तितकी जागा विकत घेवू असे मत व्यक्त केले. प्रत्येक आमदार, खासदार, यांच्यासह लोकप्रतिनिधी यासाठी मदत करतील. याच जोरावर आपण जागा विकत घेण्याचे धाडस दाखवू असे सांगीतले.
आमदार सुरेश हाळवणकर यांनी मराठा समाजाने मराठा मोर्चाच्या माध्यमातून आपली ताकत दाखवून दिली आहे. यामुळे समाजच्या विरोधात जाण्याचे धाडस कोणी करणार नाही. सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देवून हि जागा देण्याची मागणी करण्याचे मत व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार बजरंग देसाई, के. पी. पाटील, संजय डि. पाटील, ए. वाय. पाटील, अरुण इंगवले, अ‍ॅड. शिवाजी चव्हाण, संपतराव पवार पाटील, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. विवेक घाटगे, शैलजा भोसले, अंजली समर्थ यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...