आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगावात मराठीचे अस्तित्व पुन्हा सिद्ध, 5 पैकी 2 जागा जिंकल्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कर्नाटकातील बेळगाव आणि परिसरातील जनतेने स्वाभिमान दाखवत महाराष्‍ट्र एकीकरण समितीच्या दोन उमेदवारांना विजयाचा गुलाल उधळण्याची संधी मिळवून दिली आहे. समितीने उत्तर बेळगाव, दक्षिण बेळगाव, खानापूर, बेळगाव ग्रामीण आणि निपाणी अशा 5 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते; परंतु ग्रामीणमध्ये बंडखोरी झाल्याने तेथे समितीला पराभव पत्करावा लागला. पाचपैकी निपाणीतील उमेदवार अतिशय कच्चा असल्याने त्याला चार आकडी संख्याही गाठता आली नाही, तर बेळगाव उत्तरमध्ये समितीचा उमेदवार दुस-या क्रमांकावर, परंतु अत्यंत कमी मतांवर राहिला.

एकून 5 उमेदवार त्यातील 2 विजयी तर, 3 पराभूत

बेळगाव दक्षिणेत मराठीच- म.ए.समितीचे उमेदवार माजी महापौर संभाजी पाटील यांनी भाजपचे अभय पाटील यांना सहा हजारपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले. काँग्रेसमधील वजनदार नेते अनिल पोतदार हे तिस-या क्रमांकावर फेकले गेले. अभय पाटील 48116, संभाजी पाटील 54426, अनिल पोतदार 20536, तर कर्नाटक जनता पार्टीचे डॉ. सिद्धाप्पा दोड्डमनी यांना 5597 मते मिळाली. संभाजी पाटील यांनी महाराष्‍ट्र एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर यांच्याशी असलेले वैर मिटवून घेतल्याने त्यांचा विजय सुकर झाला.


बेळगाव उत्तरमध्ये पीछेहाट- या मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार फिरोज सेठ यांना दिलेली उमेदवारी त्यांनी सार्थ ठरवली आहे. मुस्लिम मतदारांची संख्या अधिक असल्याचा फायदा घेत संभाव्य फूट टाळत त्यांनी 32881 मते मिळवत विजय संपादन केला. या ठिकाणी म.ए. समितीने बेळगावच्या माजी उपमहापौर रेणूताई किल्लेकर यांना उमेदवारी देऊन किरण ठाकूर यांनी सर्व ताकद लावली होती; परंतु तरीही किल्लेकर यांना अपेक्षेपेक्षा अतिशय कमी 15522 मते मिळाली. केजेपीचे एस.सी. माळगी यांना 12526, तर भाजपचे किरण जाधव यांना 12033 मते मिळाली.


खानापूरमध्ये मराठीचा जल्लोष- खानापूर मतदारसंघात पहिल्यापासून प्रचारात आघाडी घेतलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे अरविंद पाटील यांनी 17 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे रफिक खानापूरी यांचा पराभव केला. अपक्ष उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे 17686 मते मिळवली.


निपाणीत काँग्रेसला हादरा- चौथ्यांदा आमदार होण्यासाठी रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या काकासाहेब पाटील यांना भाजप आणि जनता दल (सेक्युलर) युतीच्या उमेदवार भाजपच्या कर्नाटक राज्य सचिव शशिकला जोल्ले यांनी पराभूत केले आहे. गेली काही वर्षे तिरंगी लढतीचा फायदा घेत आमदार होणा-या काकासाहेबांना या वेळी मात्र विचारसरणी भिन्न असूनही भाजप, जद (सेक्युलर) युतीने नेस्तनाबूत केले. या ठिकाणी महाराष्‍ट्र एकीकरण समितीने पूर्ण दुर्लक्ष केले होते. केवळ औपचारिकता म्हणून उमेदवार येथे दिला होता. परिणामी समितीचे उमेदवार बाबासाहेब देसाई यांना 894 एवढीच मते मिळाली. शशिकला जोल्ले यांना 81860, तर काँग्रेसचे काका पाटील यांना 63198 मते मिळाली.


बेळगाव ग्रामीण, फुटीचा फटका- म. ए. समितीमध्येच फूट पडल्याने मनोहर किणेकर यांचा भाजपचे संजय पाटील यांनी पराभव केला. केवळ 1335 मतांनी त्यांचा पराभव झाला असून अन्य मराठी उमेदवार शिवाजी सुंठकर यांना 15759 मते मिळाली. संजय पाटील यांना 38322, किणेकर यांना 36987, काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांना 35811 मते मिळाली. दोन मराठी उमेदवारांपैकी सुंठकर यांनी माघार घेतली असती तर किणेकरांच्या रूपाने समितीची तिसरी जागा निवडून आली असती.