आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैन करण्यासाठी हुशार विद्यार्थी बनला अट्टल चोरटा, ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस राज्यात दुसरा, सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस राज्यात बारावा आणि दहावीच्या परीक्षेत तब्बल ९४.६० टक्के गुण मिळवलेल्या युवकाने आपली बुद्धी चैनीसाठी चोऱ्या करण्यात पणाला लावल्याचे उघडकीस अाले अाहे. पाेलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडून ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काेल्हापूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या अवधूत ईश्वरा पाटील या १९ वर्षांच्या या युवकाच्या कारनाम्याने पोलिसही चक्रावले आहेत.

भुदरगड तालुक्यातील देऊळवाडी येथील हा युवक. आई अंगणवाडी शिक्षिका. एक भाऊ पुण्यात इजिनिअरिंग करतोय. बहीणही बी.एस्सी. झालीय. अवधूतही पहिल्यापासून हुशार. दहावीत मेरिटचे गुण मिळाल्याने एमबीबीएस करण्याच्या इराद्याने त्याने कोल्हापुरात नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतला. उत्तम गुण मिळाल्याने गावात त्याचे काैतुकही झाले. कोल्हापुरात भाड्याच्या खोलीत तो राहत होता. या महाविद्यालयात येणारी मुले- मुली हायफाय कपडे घालतात, गाड्या घेऊन येतात परंतु आपल्याकडे यातील काहीच नाही याची खंत अवधूतला होती. यातूनच त्याने चोऱ्या करायला सुरुवात केली. मित्राचेच दोन मोबाइल चोरून विकल्यानंतर त्याला ३२०० रुपये मिळाले. मग अशा चाेऱ्यांतील गोडी वाढत जाऊन त्याने अशा कारनाम्यांचा सपाटाच लावला. लॅपटाप, मोबाइल, पाकिटे चोरता चोरता त्याने घरांचे, फ्लॅटचे कडीकोयंडे उचकटून घरफोड्या करायला सुरुवात केली. दहा घरफोड्यांचे गुन्हे त्याच्यावर दाखल झालेत. गोवा आणि सावंतवाडी येथून त्याने दोन मोटारसायकली चोरल्याचेही समाेर अाले अाहे. या सगळ्याचा तपास करून कोल्हापूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने नुकतीच अवधूतला अटक केली. त्याच्याकडून ११ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल पुन्हा वसूल केला आहे.
ओएलएक्सचा वापर
चाेरलेल्या वस्तू विकण्यासाठी अवधूतने ‘ओएलएक्स’वर खोटे अकाउंट उघडले. त्या माध्यमातून चाेरलेल्या अनेक वस्तू त्याने विकल्या. ताे कोल्हापुरात भाड्याच्या खोलीत राहत असताना घरच्यांनी दिलेले एक हजार रुपये व भावाने दिलेला मोबाइल कुणीतरी चोरला. याच रागातून आपणही चोऱ्या करायला सुरुवात केल्याचे तो सांगतो.