कोल्हापूर - राज्य शासनाने आयआरबी कंपनीला कोल्हापुरातील टोल वसुली बंद करण्याचे आदेश अद्यापही न दिल्याच्या निषेधार्थ महापौर सुनिता राऊत आणि अन्य पदाधिका-यांनी शुक्रवारी पालिकेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. तसेच सरकारी गाड्या, मोबाइलही परत करून टाकले.
आयआरबीने पुन्हा टोलवसुली केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील सर्व नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांनी आपापले राजीनामे दिले आहेत. बुधवारी महापौर व नगरसेवकांनी टोलनाक्यांवर चाल केली होती. त्या वेळी झालेल्या धक्काबुक्कीत महापौरांना किरकोळ दुखापत झाली होती. या कारणावरून गुरुवारी कोल्हापूर बंद पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापौरांसह सर्वच पदाधिका-यांनी महापालिकेची वाहने व मोबाइल परत करून टाकले. शुक्रवारची महापालिकेची स्थायी सभाही रद्द करण्यात आली.
दरम्यान बुधवारच्या आंदोलनावेळी टोलनाक्यांवर 144 कलम लागू केले होते. तरीही महापौरांसह सर्व नगरसेवक त्या ठिकाणी एकत्र जमले आले. या वेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व फुटेज पाहता कुठेही महापौरांवर लाठीमार करण्यात आला नसल्याचे पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी स्पष्ट केले.