आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Member Of Parliament Raju Shetty Comment On State Government

कारखानदारांची बाजू घ्याल तर सरकारविरोधी बंड पुकारू- राजू शेट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- ‘उसाच्या एफआरपीचे तीन हप्ते पाडण्याचे कटकारस्थान उधळून सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे. मात्र जर आमचेच सरकार साखर कारखानदारांच्या बाजूने उभे राहणार असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या सरकारच्याविरोधातही बंड करायला तयार आहे,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दिला.

दरम्यान, आगामी हंगामात ऊसदराची मागणी करण्यासाठी सहा नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषद होणार असल्याची त्यांनी घोषणा केली. कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर ते बोलत होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राष्ट्रवादीच्या आतापर्यंतच्या कारभाराचा पंचनामा केला. टाळ्या आणि शिट्ट्यांनी शेतकऱ्यांना या दोघांच्या भाषणालाही प्रतिसाद दिला.

दसरा चौकातून रणरणत्या उन्हात या मोर्चाला सुरुवात झाली. शहरातून फिरून लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालकांच्या कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी वाहतूक बंद करून एका ट्रॉलीमध्ये स्टेज तयार करण्यात आले. या वेळी शेट्टी यांनी दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांवर हल्ला चढवतानाच आपल्या मित्रपक्ष भाजपचे नेते व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही सोडले नाही. ‘सहकारमंत्री वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं बोलत आहेत. त्यांनी आधी नीट अभ्यास करावा आणि मग आपली मते व्यक्त करावीत नाही तर गाठ शेतकऱ्यांशी आहे हे त्यांनी ध्यानात घ्यावे,’ असा इशारावजा सल्लाही शेट्टींनी दिला. या वेळी सदाभाऊ खाेत, भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, सतीश काकडे यांची भाषणे झाली. पृथ्वीराज जाचक, सावकर मादनाईक अादी या वेळी उपस्थित होते.

पवार, पाटील यांना अधिकारच काय?
मंत्री समितीच्या बैठकीला अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांना बसण्याचा अधिकार काय असा सवाल या वेळी शेट्टी आणि खोत यांनी उपस्थित केला. या दोघांनी बाहेर येऊन एफआरपी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय झाल्याचे सांगून घोळ घातला. ‘त्यांना का बोलावले?’ याचा खुलासा सरकारला करावा लागेल असे या वेळी शेट्टी यांनी ठासून सांगितले.

‘नरडीवर पाय ठेवून वसुली करू’
‘साखरेचे दर वाढल्यानंतरही जर एफआरपीचा फरक दिला नाही तर नरडीवर पाय ठेवून वसुली करू. कारखानदार सरळ देणी देणार नसतील तर सरकारने त्यांची मालमत्ता जप्त करावी,’अशी मागणी शेट्टी यांनी केली. इथे येण्याआधीच आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो, आपणही शेतकऱ्यांच्याच बाजूने असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, असे शेट्टी म्हणाले.

तब्बल ६९ हजार शेतकऱ्यांचे निवेदन
अनेक कारखानदारांनी तीन टप्प्यात एफआरपी देण्याबाबत ठराव करून घेतले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून स्वाभिमानीने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ६९,२०८ शेतकऱ्यांच्या सह्या असलेले व एफआरपी एकाच टप्प्यात द्यावी अशी मागणी करणारे निवेदन प्रादेशिक साखर संचालक यांना दिले. एवढ्या निवेदनाने त्यांचे पूर्ण टेबल भरून गेला होता.

पुढील स्लाइडवर वाचा, शरद पवार गुरू नव्हे भस्मासुर : सदाभाऊ खोत