आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्सिडीझ उलटून तीन ठार; गाडीची ट्रायल घेणे तरुणांच्या जिवावर बेतले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- सेकंड हँड मर्सिडीझ कारची ट्रायल घेताना भरधाव वेगामुळे ती उलटून झालेल्या अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले. रविवारी मध्यरात्री कोल्हापूरजवळील राष्‍ट्रीय महामार्गावर सांगली फाट्याजवळ हा अपघात झाला.

मुंबईहून आणलेली मर्सिडीझ गाडीची ट्रायल घेण्यासाठी चौघे युवक गाडी घेऊन कोल्हापूरकडे भरधाव निघाले होते. मात्र, ताबा सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकून सात ते आठ फूट खाली असलेल्या सर्व्हिस रोडवर उलटून पडली. यात प्रवीण अनिल कुरणे (वय 20 रा. शिये), ओंकार संताजी घोरपडे (रा. कसबा बावडा) अजिज मुजावर (वय 18 रा. पुलाची शिरोली) हे तिघे जागीच ठार झाले, तर मंजूर नजीर शेख (रा. लाइन बाजार, कोल्हापूर) हा
गंभीर जखमी झाला.
अपघात इतका गंभीर होता की, कारमधील एकाचा मृतदेह शेजारच्या शेतात जाऊन पडला होता. त्यामुळे घटनास्थळी सापडलेल्या तिघांनाच सुरुवातीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, आणखी एक जण कारमध्ये होता, हे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा अपघाताच्या परिसरात शोध घेण्यात आला. तब्बल दोन तासांनी त्याचा मृतदेह परिसरातील शेतात सापडला.

दिवाळीतच काळाचा घाला, दांपत्याचा मृत्यू
चार दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा परिसरातच कार उलटून दीपक जोशी व दीपश्री जोशी या दांपत्याचा अंत झाला होता. जोशी हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी बँकेतून आॅगस्ट महिन्यात निवृत्त झाले होते. हे दोघे, त्यांचा मुलगा आणि त्याचा मित्र असे चौघेजण शुक्रवारी रात्री पुण्याहून निघून शनिवारी पहाटे कोल्हापूरला येत होते. समोर शहर दिसत असताना याच परिसरात त्यांची भरधाव गाडी उलटून जोशी दांपत्य ठार झाले होते.