आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Post Issue In Shiv Sena And BJP In Maharashtra

भाजपला चार, शिवसेनेला दोन; मेटे, जानकर, खोत यांना मंत्रिपद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अाहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची नावे निश्चित आहेत. आठवलेंच्या रिपाइंला एक जागा देण्यात येणार असून त्यांच्याकडून अजून नाव निश्चित झालेले नाही.

या चौघांव्यतिरिक्त भाजपचे चार आणि शिवसेनेचे दोघे असे १० मंत्री शपथ घेतील, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

बिहार विधानसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर भाजपला मित्रपक्षांची काळजी वाटू लागली आहे. निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केली होती. त्यासंदर्भात पाटील म्हणाले, ‘मंत्रिमंडळात १२ जागा शिल्लक आहेत. त्यातील १० जागा भरू.’

कोल्हापुरात पाठिंब्यासाठी पवारांनी दिला नकार
कोल्हापूर महापालिकेत सत्तास्थापनेसाठी आम्हाला जागा कमी पडत असल्याने विकासासाठी सहकार्य करा, असे आवाहन आम्ही दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांना केले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशा होती. मात्र पवार यांच्याकडून नकारात्मक संकेत मिळाल्याने आता विरोधी बाकावर बसून आम्ही प्रबळ विरोधकाची भूमिका बजावू, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्याला आणखी २ लाल दिवे मिळणार
विस्तारातील दहापैकी दोन मंत्रिपदे मराठवाड्याच्या वाट्याला येण्याची चिन्हे आहेत. मित्रपक्षाच्या कोट्यातील एक पद विनायक मेटे (बीड) यांना तर शिवसेनेच्या कोट्यातील एक मंत्रिपद मराठवाड्याला मिळणार आहे. त्यात औरंगाबादचे संजय शिरसाट किंवा जालन्याचे अर्जुन खोतकर यांची नावे चर्चेत आहेत. यापूर्वी पंकजा मुंडे व बबनराव लोणीकर यांच्या रूपाने दोनच मंत्रिपदे मराठवाड्याला मिळालेली आहेत.