आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Wife Lived Last Movment In Iron Room, Karkhanis Aunty Conserve Simple

आमदार पत्नीचा अखेरचा श्वास पत्र्याच्या खोलीत, कारखानीस काकींनी जपला पतीचा साधेपणाचा आदर्श

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - माजी पंतप्रधान इंदिरा गांधींपासून ते यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत ज्यांचे थेट संबंध होते, कोल्हापूर जिल्ह्यात ज्यांनी 21 वर्षे आमदार म्हणून काम केले त्या त्र्यंबक सीताराम कारखानीस यांच्या पत्नी हेमलता ऊर्फ माई यांचे शुक्रवारी निधन झाले. नि:स्वार्थीपणे राजकारण व समाजकारण केलेल्या त्र्यंबकरावांनी अत्यंत साधेपणाने जीवन व्यतीत केले. पतीच्या या विचारांना अनुसरूनच मार्इंनीही आचरण केले व अखेरचा श्वासही पत्र्याच्या खोलीत घेतला.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्र्यंबक कारखानीस यांचा लौकिक होता. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका आणि कोल्हापूर शहरचे आमदार म्हणून त्यांनी 21 वर्षे काम केले.
राज्य आणि राष्‍ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांशी घनिष्ठ संबंध असतानाही नैतिकतेचा पाया ढासळू न दिलेल्या या नेत्याने कधीही आपल्या कामासाठी कुणाकडे शब्द टाकला नाही की शिफारसही केली नाही. ते गंगावेस येथे नाईक वाड्यामध्ये भाड्याने राहत होते. नंतर 1990 मध्ये म्हाडाने बांधलेल्या 400 फुटांच्या घरात हे दांपत्य मुलगा, सून, नातवंडांसह राहायला गेले. अत्यंत साधी विचारसरणी जोपासलेल्या या व्यक्तिमत्त्वाला माई यांनीही तशीच साथ दिली. घरच्या व्यवहारात त्र्यंबकरावांना कधी लक्ष देण्याची कधी गरज मार्इंनी भासू दिली नाही. आज आमदारकीची एक टर्म झाल्यानंतर प्रचंड माया कमावणा-या नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे हे उदाहरण आहे. विशेष म्हणजे मार्इंच्या निधनाची बातमीही माध्यमांना एक दिवस उशिरा समजली.
शरद पवारांकडून सहकार्य
कारखानीस यांच्या कामाची पद्धत माहीत असलेल्या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मात्र एक दक्षता याआधीच घेऊन ठेवली होती. त्यांच्या नावे 1 लाख 20 हजारांची ठेव काही वर्षांपूर्वी ठेवली होती. त्याच्या व्याजातून या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी मदत होत होती.