आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साता-यात मनसेची परप्रांतीयांना मारहाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - जिल्ह्यातील सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेल्या उत्तर भारतातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मारहाण केली. त्यामुळे शहरातील शासकीय रुग्णालयात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांची फिटनेस प्रमाणपत्रासाठी सोमवारी क्रांतिसिंह पाटील शासकीय रुग्णालयात तपासणी सुरू होती. या शाळेत काही परप्रांतीयांनाही प्रवेश दिला जात असल्याचे समजताच मनसेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले व कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. तेथील कर्मचा-यांकडे त्यांनी विचारपूस केली तसेच परप्रांतीय विद्यार्थी व पालकांना भेटण्यासाठी आग्रह केला. काही पालक समोर आले असता कार्यकर्त्यांनी थेट त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच ‘तुम्हाला फिटनेस प्रमाणपत्र देणार नाही, ताबडतोब निघून जा,’ असा दमही भरला. या प्रकारामुळे घाबरलेल्या पालकांनी रुग्णालयातून काढता पाय घेतला. दरम्यान, या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता.

बोगस प्रमाणपत्राद्वारे प्रवेश
भोसले म्हणाले की, सैनिकी शाळेच्या प्रवेशासाठी 11 वर्षे वयोमर्यादा आहे. मात्र, परप्रांतातून आलेले विद्यार्थी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश घेऊ पाहत आहेत. जी मुले मागील वर्षी अनुत्तीर्ण झाली त्यांनाही नाव, आडनाव बदलून पुन्हा प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे मराठी मुलांना प्रवेश मिळत नाही. परप्रांतीयांसाठी प्रवेशासाठी आरक्षण आहे; परंतु बोगस प्रमाणपत्राद्वारे प्रवेश देण्यास आमचा विरोध राहील.