सातारा - ‘कराडमध्ये कॉंग्रेसला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहून
नरेंद्र मोदी घाबरले. त्यांच्या पक्षाचा उमेदवार पराभूत होणार असल्याचा अंदाज आल्याने ते इथे सभा घेण्यासाठी इथे आले नाहीत,’ असा दावा माजी मुख्यमंत्री तथा दक्षिण कराडमधील कॉंग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला. ‘गुजरात विकसित आहे हे दाखवण्यासाठी महाराष्ट्राचा अवमान करू नका,’ असा इशाराही त्यांनी दिला.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी चव्हाण यांनी कराडमधील दत्त चौकात सभा घेतली, या वेळी ते बोलत होते. त्यांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस राबणा-या कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुकही केले. ‘कॉंग्रेसला एकहाती सत्ता द्या. तुमचे मतदान केवळ एका आमदाराला नव्हे तर मुख्यमंत्र्यांना होणार आहे, याचा विचार करा,’ असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
केवळ गुजरातचा विकास सांगणा-या मंडळींना महाराष्ट्राचा अवमान करू नये. गुजरातचा विकास झाला तर आम्हाला आनंदच अहे, परंतु महाराष्ट्र आजही प्रथम क्रमांकावर आहे व तो कायम राहील. तुमचा विकास सांगण्यासाठी आम्हाला कमी लेखू नका,’ असे चव्हाणांनी मोदींना सुनावले. ‘राज्यातील सुजाण जनता जातीयवादी पक्षांच्या हाती सत्ता देणार नाही,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘राज्याचे तुकडे करण्याची भाजपाची नीती आहे. स्वतंत्र विदर्भ किंवा छोटी राज्ये करण्याचे मनसूबे भाजप आखत आहे. मात्र तसा प्रयत्न जरी झाला तरी राज्यातील जनता पेटून उठेल,’ असा इशाराही चव्हाणांनी दिला. ‘भाजपच्या ज्युनियर नेत्यांनी कराडमध्ये सभा घेत येथील उमेदवाराला मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले आहे. पण ज्यांनी आश्वासन दिले त्या राजीवप्रताप रुडी यांनाच केंद्रात मंत्रिपद का मिळाले नाही? ’ असा सवालही चव्हाणांनी उपस्थित केला.