आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाला पहिली उचल ३२०० रु. द्यावी; \'स्वाभिमानी\'च्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयसिंगपूर (जि. कोल्हापूर)- केंद्र सरकारने उसाला जाहीर केलेल्या रास्त किफायती मूल्यापेक्षा (एफआरपी) सुमारे ३५ टक्के जास्त पहिली उचल मागून सत्ताधारी भाजपचा मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर उद्योगाला कोड्यात टाकले आहे.

‘विनाकपात ३२०० रुपये प्रतिटन उचल मिळाल्याशिवाय उसाला कोयता लागू द्यायचा नाही. अंतिम दराचे नंतर बघू,’ अशी घोषणा संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी ऊस परिषदेत केली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी वाटेल ते आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. उपस्थित ऊस उत्पादकांनी जोरदार घोषणा करत त्याला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे अाता राज्य सरकारचीही दिवाळी चिंतेत जाण्याची शक्यता आहे. सध्या कारखान्यातील साडेनऊ टक्के साखर उताऱ्याला २३०० रुपये ‘एफअारपी’ असून त्यापुढील प्रत्येक एक टक्का वाढीव उताऱ्यामागे २४२ रुपये जादा ‘एफअारपी’ अाहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंधरावी ऊस परिषद मंगळवारी जयसिंगपूर (जि. काेल्हापूर) येथे पार पडली. राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक अध्यक्षस्थानी होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, कर्नाटक रयत संघटनेचे अध्यक्ष कुडीहाळी चंद्रशेखर आदी उपस्थित हाेते. “राज्य सहकारी बँकेने कारखान्यांकडील साखरेच्या केलेल्या मूल्यांकनानुसार मराठवाड्यासाठी २१०० रुपये प्रतिक्विंटल आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी २५०० ते २७०० रुपयांची पहिली उचल येते. राजू शेट्टी सरकारमध्ये आहेत. मागणी करण्यापूर्वी त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी,’ असे मत राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, ‘हुतात्मा’ ‘माळेगाव’ कारखान्यांची गेल्या वर्षीची एफआरपी अनुक्रमे २७२४ २४१२ रुपये असताना त्यांनी अनुक्रमे २७७५ २८०० रुपये दिली. याबद्दल शेट्टी यांच्या हस्ते दोन्ही कारखान्यांच्या अध्यक्षांचा या वेळी सत्कार करण्यात आला. भाजप सरकारला पाठिंबा दिल्यामुळे ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची धार संपल्याची टीका होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर ऊस परिषदेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळणार का, याबद्दल साशंकता व्यक्त होत होती. मात्र गेल्या वेळपेक्षा मोठ्या मैदानात परिषद घेऊनही राज्यातल्या कर्नाटकातल्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. सुमारे चार तास परिषद चालली. शेट्टी यांनी मांडलेल्या १० ठरावांना एकमुखी पाठिंबा देण्यात आला.

“सन २०१६-१७ च्या हंगामात गाळपास जाणाऱ्या उसाची एफआरपी कृषी मूल्य आयोगाने गेल्या वर्षी इतकीच सुचवली. मात्र शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. साखर, उपपदार्थांचे दर चांगले वाढले आहेत. म्हणून यंदा पहिली उचल विनाकपात एकरकमी ३२०० रुपये द्यावी,’ असा ठराव शेट्टी यांनी मांडला. ‘एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील साखरेचे दर ३२०० ते ३६०० रुपये क्विंटल आहेत. केंद्र राज्य सरकारने कारखान्यांना मदत केली आहे. राज्य सहकारी बँकेने साखरेचे मूल्यांकन ३२०० रुपये केले आहे. त्यामुळे कारखान्यांना ३२०० रुपये पहिली उचल देणे जड जाणार नाही,’ असे ते म्हणाले. ऊसतोडणी मजुरांच्या मंडळासारखा ऊस वाहतूकदार महासंघ निर्माण करावा. या संघामार्फत राज्यासाठी एकसमान ऊस वाहतूक दर निश्चित करावेत. याच महासंघामार्फत मजुरांच्या टोळ्यांचे करार करावेत, असा ठराव झाला. गेल्या वर्षीची एफआरपी दिलेल्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, साखर कारखाना विक्री घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी हे प्रकरण ईडीकडे द्यावे, आधारभूत किंमत देणारी सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करावीत आदी ठरावही परिषदेत मंजूर करण्यात आले.

कारखान्यांकडे पैसे उपलब्धच नाहीत
साखरेचे दरच सध्या साडेबत्तीसशे रुपये आहेत. बँकांची उचल याच मूल्यांकनानुसार ठरते. प्रतिक्विंटल साखरेला १९७० रुपयांची उचल बँकांनी देऊ केली आहे. उपपदार्थ विक्रीच्या रकमा उशिरा मिळतात. अनेक कारखान्यांकडे उपपदार्थ निर्मितीच नाही. साखर उताऱ्यानुसार प्रत्येक कारखान्याची एफआरपी वेगळी येते. कारखान्यांकडे पैसे उपलब्धच नसल्याने ‘स्वाभिमानी’ची मागणी पूर्ण करायची तर ही तफावत कशी भरायची, हा प्रश्न आहे.
- संजीव बाबर, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर कारखाना संघ

अजित पवारांवर सदाभाऊंची टीका
‘५०वर्षे सत्ता उबवलेले गडी मला विचारतात, दुधाला, उसाला भाव काय देणार? प्रश्न तुम्ही निर्माण केले. ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तुमच्यासारखे आम्हाला धरणे ‘फुल’ करायला नसेल जमले. आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून कितीदा शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला ते सांगावे. शेतकऱ्यांसाठी तुरुंगात कधी गेला ते सांगावे. तुम्ही जेलमध्ये जाणारच आहात, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नाही, सत्तेत असताना जेवढे गिळले त्यासाठी,’ अशी टीका कृषी राज्यमंत्री सदा खाेत यांनी अजित पवारांचे नाव घेता केली.
बातम्या आणखी आहेत...