आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुती की कॉँग्रेस? खासदार मंडलिक आज निर्णय घेणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - कोणत्याही परिस्थितीत जातीयवाद्यांशी हातमिळवणी करणार नाही, असे गेली साडेचार वर्षे छातीठोकपणे सांगणारे अपक्ष खासदार सदाशिवराव मंडलिक कॉँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आता निवडणुका तोंडावर येताच ते महायुतीच्या वाटेवर असल्याचेही सांगितले जाते. रविवारी सर्मथकांच्या मेळाव्यात ‘जर कोल्हापूरची जागा काँग्रेस आपल्याकडे घेणार नसेल तर मंडलिक यांनी वेगळा विचार करावा,’ अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. याबाबत अंतिम निर्णय मंडलिक सोमवारी घेणार आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मंडलिक यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे बंडखोरी करत अपक्ष लढलेल्या मंडलिकांनी राष्ट्रवादीचा पराभव केला होता तसेच कॉँग्रेस सरकारला बिनशर्त पाठिंबाही दिला होता. आघाडीत कोल्हापूरचा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटलेला आहे. तो कॉँग्रेसने घेऊन आपल्याला उमेदवारी दिल्यास कॉँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी मंडलिकांनी दाखवली होती. मात्र मंडलिकांसाठी जागा कॉँग्रेसला सोडण्यास पवार तयार नाहीत. आघाडीत तणाव नको म्हणून कॉँग्रेसनेही या जागेचा हट्ट सोडला. त्यामुळे मंडलिक कॉँग्रेसवर खवळले आहेत.

कॉँग्रेसला अखेरची संधी
महायुतीच्या पाठिंब्यावर आपले चिरंजीव व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांना उभे करण्यासाठी हालचाली मंडलिकांनी सुरू केल्या. दिल्लीत त्यांनी राजू शेट्टी यांची भेटही घेतली. महायुतीत कोल्हापूर मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र मंडलिक यांना शिवसेनेकडून नव्हे तर स्वाभिमानी संघटनेचे तिकिट हवे आहे. तर मंडलिक यांनी ‘धनुष्यबाणा’वर लढावे, असा शिवसेनेचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर अंतिम निर्णय घेण्यासाठी मंडलिकांच्या सर्मथकांचा रविवारी मेळावा झाला. त्यात कॉँग्रेसला निर्णयासाठी अखेरची संधी द्यावी किंवा महायुतीचा पर्याय निवडावा, या पर्यायावर चर्चा झाली.