आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सनातन'वर बंदीच्या प्रस्तावाचे काय झाले? दाभोलकरांच्या कन्येचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- ‘डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातही सनातन संस्थेच्या साधकाचा सहभाग समोर आला आहे. आता तरी सनातन संस्थेवर बंदीच्या प्रस्तावावर कोणती भूमिका घेणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे’, अशी मागणी दाभाेलकरांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

‘गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे सनातन संस्थेच्या साधकाचा सहभाग असल्याचे तपास यंत्रणांना दिसून आले. आता डॉ. दाभोलकरांच्या खुनामागेही सनातनचेच कार्यकर्ते असल्याचे तपासात पुढे आले आहे. गोव्यातील बॉम्बस्फोटात केंद्रीय तपास यंत्रणांना हवा असलेल्या सारंग अकोलकरचा यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गोवा स्फोटातील चारही संशयितांना अटक करावी, अशी आमची मागणी आहे. सनातन संस्थेचे कायदा सल्लागार अॅड. संजीव पुनाळेकर यांनी ‘मडगाव स्फोटातील फरारी संपर्कात असल्याचे सांगितले आहे, तरीही पोलिसांना हे संशयित सापडत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. म्हणून अॅड. पुनाळकर यांचीही चौकशी व्हावी,’ अशी मागणी मुक्ता यांनी केली.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागील सूत्रधारांना अटक होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील, असे स्पष्ट करताना मुक्ता म्हणाल्या, ‘या खुनाचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जातात. दबाव आणला जातो. तरीही सरकारची भूमिका ठोस नाही. वास्तविक दाभोलकरांच्या खुनानंतर सनातन संस्थेवर बंदी आणली असती तर पानसरे, प्रा.कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या नसत्या. यापुढील अनर्थ तरी सरकार थांबवेल काय,’ अशी विचारणा मुक्ता दाभोलकर यांनी केली.

तावडेचे मिरज कनेक्शन
नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेला डाॅ. वीरेंद्र तावडे हा सनातन संस्थेच्या मिरज आश्रमाचा सात ते आठ वर्षे व्यवस्थापक होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमांमध्ये येऊन तो गोंधळ घालत असे, असे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापक राहुल थोरात यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...