आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Crime Branch Team In Kolhapur For Govind Pansare Attacked Investigation News In Marathi

आरोपींचा शोध लागेना; उमा पानसरेंच्या जबाबावर तपासाची दिशा अवलंबून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांची प्रकृती स्थिर असू्न त्यांच्या पत्नी उमा यांची प्रकृती सुधारत अाहे. अाता उमा यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीनंतरच हल्लेखाेरांचे धागेदाेरे शाेधणे पाेलिसांना शक्य हाेणार अाहे. मात्र, उमा पानसरे यांचा जबाब मिळण्यासाठी पाेलिसांना अाणखी दाेन दिवस प्रतीक्षा करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला अाहे.
सोमवारी पानसरे दांपत्यावर गोळीबार झाल्यानंतर बुधवारी या दोघांच्याही तब्येतीत सुधारणा झाली आहे. पानसरे यांची प्रकृती नाजूक असली तरी स्थिर आहे. ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. ते शुद्धीवर असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार हात-पाय हालवत आहेत. नाडी ठोके, रक्तदाब स्थिर आहे. नळीवाटे त्यांना पाणीही देण्यात आले आहे.
फुप्फुसाला आलेली सूज व तीन शस्त्रक्रियांमुळे होणाऱ्या वेदना याचा त्यांना त्रास होऊ नये म्हणूनच त्यांना काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येणार असल्याचे अॅस्टर आधार रुग्णालयाचे डॉ. अजय केणी यांनी सांगितले. तसेच उमातार्इंना नळीवाटे पाणी देण्यात येत असून त्यांचा उजवा पाय व हात जरा जड आहे; परंतु त्याही मर्यादित प्रमाणात हालचाल करत असल्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले.

पाेलिसांच्या तपासाची दिशा कर्नाटक, गाेव्याकडेही
या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी टप्प्याटप्प्याने उमातार्इंकडे चौकशी करत आहेत. अजूनही डॉक्टरांनी पूर्ण चौकशी करण्यासाठी परवानगी दिली नाही; परंतु किमान काही प्राथमिक बाबी उमातार्इंकडून कळू शकतील या आशेवर पोलिस अधिकारी असून ते सातत्याने हॉस्पिटलच्या संपर्कात अाहेत. घटनास्थळावरील बंदुकीच्या गोळ्यांच्या पुंगळ्या, रक्ताचे डाग, माती परीक्षणासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आली आहे.

पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवलेल्या पथकांकडूनही माहिती संकलित करण्यात येत आहे. हल्लेखोर या परिसरातून तातडीने कर्नाटक आणि गोव्याकडे जाऊ शकतात यामुळे त्या बाजूनेही तपास केंद्रित करण्यात आला आहे.

भाकपचे अधिवेशन ठरल्याप्रमाणेच : भालचंद्र कांगो
भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे २१ फेब्रुवारीपासून तीन दिवसांचे राज्य अधिवेशन कोल्हापुरात आयोजित करण्यात आले आहे. कॉ. पानसरे यांच्या नेतृत्वाखाली या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू होती. कार्यालय समोरील ध्वजस्तंभाची रंगरंगोटी करण्यात आली होती; परंतु पानसरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर हे अधिवेशन होईल की नाही अशी शंका होती. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अधिक जोरकसपणे हे अधिवेशन होणार असल्याचे भाकपचे वरिष्ठ नेते भालचंद्र कांगो यांनी सांगितले. दाभोलकरांच्या हत्येचा तपास न लागल्यास मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणारेच आता त्या पदावर असल्याने पानसरेंवरील हल्ल्याचा तपास लागत नसेल तर त्यांचाही आम्ही राजीनामा मागू, असे कांगो यांनी सांगितले.

...तर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल : धनंजय मुंडे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी दुपारी रुग्णालयात जाऊन पानसरे यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच पानसरे कुटुंबीयांशी चर्चा केली. ‘या प्रकरणाचा लवकर तपास लागला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरण्यासही मागेपुढे पाहणार नाही,’ असा इशारा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. या तपासासाठी मुंबई क्राइम ब्रँचची मदत घेता येईल का, याबाबत पानसरे यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून विचारणा झाली आहे. याबाबत आपण शासनाशी बोलणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबई क्राइम ब्रँचचे पथक करणार स्वतंत्र तपास
हल्ल्याच्या चौकशीसाठी मुंबई क्राइम ब्रॅंचच्या खास अधिकाऱ्यांचे पथक बुधवारी कोल्हापुरात दाखल झाले आहे. हे पथक स्वतंत्रपणे तपास करणार आहे. दुसरीकडे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पानसरे यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर सुसाट वेगाने दुचाकीवरून गेले. त्यामुळेच या परिसरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाची तपासणी सुरू आहे. हल्ला झाला त्या परिसरातील शाळेने सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे, परंतु त्यात केवळ शाळेच्या कंपाउंडचाच भाग चित्रित हाेत असल्याने हल्लेखाेर त्यात कैद हाेऊ शकले नाहीत.
सीबीअाय तपासासाठी जनहित याचिका-
पानसरेंवरील हल्ल्याची सीबीअाय चाैकशी करावी, या मागणीची जनहित याचिका पत्रकार केतन तिराेडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली अाहे. पुण्यातील डाॅ. नरेंद्र दाभाेलकर व काेल्हापुरात पानसरेंवर झालेल्या हल्ल्याची माेडस अाॅपरेंडी समान अाहे. पानसरे यांनाही दाभाेलकरांप्रमाणेच धमक्या अाल्या हाेत्या. दीड वर्षानंतरही दाभाेलकरांचे मारेकरी शाेधण्यात पाेलिसांना यश अालेले नाही, त्यामुळे पानसरेंवरील हल्ल्याच्या तपास सीबीअायकडे द्यावा, अशी मागणी याचिकेत अाहे. अारटीअाय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येतील अाराेपही अजून फरारच असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.