आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्रुपद शैलीत बासरीचे धडे देणारे गुरुकुल, देशातील पहिलीच संस्था सांगलीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया असलेल्या ध्रुपद शैलीचा प्रचार व्हावा, या हेतूने सांगलीत महाराष्ट्रातील पहिले ध्रुपद शैलीचे गुरुकुल विकसित होत आहे. विशेष म्हणजे ध्रुपद शैलीत बासरी वादनाचे धडे देणारे हे देशातील एकमेव गुरुकुल ठरणार आहे. येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात सुरू झालेल्या या गुरुकुलात सध्या 50 विद्यार्थी गायन, पखवाज आणि बासरी वादनाचे धडे घेत आहेत.

तानसेन यांच्यानंतर बैजू बावरा व डागरांच्या तब्बल 20 पिढय़ांनी ध्रुपद गायनाची तपश्चर्या केली; मात्र त्यांना राजार्शय मिळाला नाही. मध्य प्रदेशात मात्र त्याला चांगला राजार्शय मिळाला. गुंदेचा बंधूंनी उभारलेल्या गुरुकुलाला युनेस्कोने वेळोवेळी सहकार्य केल्याने देश-विदेशातील विद्यार्थ्यांनी येथे संगीताचे धडे घेतले. त्यांच्यामुळे विदेशातही त्यावर संशोधनही झाले. महाराष्ट्रात मात्र त्याचा फारसा प्रसार झाला नाही. डागरांचे पुत्र सैफुद्दीन डागर यांनी उतारवयात पुण्यात राहून ध्रुपद गायन शैलीचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र राज्य सरकारने त्यांना फारशी दाद दिली नाही. गुंदेचा बंधूंच्या गुरुकुलात तयार झालेले सांगलीचे बासरीवादक समीर इनामदार आणि नैनितालचे प्रदीपकुमार चोप्रा यांनी गौतम पाटील यांच्या प्रेरणेने शांतिनिकेतन लोकविद्यापीठात ध्रुपद शैलीचे गुरुकुल सुरू केले आहे. या ठिकाणी गायकीबरोबरच ध्रुपदात पखवाज, बासरीवादनाचे धडे दिले जातात. बासरीवर ध्रुपदाचे धडे देणारे गुरुकुल भारतात अन्यत्र कोठेही नाही, असा दावा समीर इनामदार यांनी केला.
इनामदार आणि चोप्रा यांना हे गुरुकुल आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचे आहे. भविष्यात निवासी सोय उपलब्ध करून देण्याचाही मानस आहे.

सरकारची उदासीनता : डागर बंधूंचे वारस सैफुद्दीन डागर यांची पुण्यात गुरुकुल सुरू करण्याची इच्छा होती. मात्र राज्य शासनाने त्यांना ‘ओळख’ विचारली, यासारखे दुर्दैव नाही. मध्य प्रदेश सरकारने संगीताच्या विकासाला चालना दिली आहे. त्यामुळे सध्या संगीतकला शिकण्यासाठी देश-विदेशातील विद्यार्थी तेथे जातात. सांगलीचे गुरुकुल हे बासरीवर ध्रुपदाचे धडे देणारे एकमेव असल्याने त्यासाठी सरकारने सहकार्य करण्याची गरज आहे.
ध्रुपद शैलीचे वैशिष्ट्य
ध्रुपद हा भारतीय शास्त्रीय संगीताचा मूळ प्रकार मानला जातो. मनाला शांतता देणारी ध्रुपद शैली माणसाच्या वर्तनावरही परिणाम करते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. सुरांच्या शुद्धतेमुळे या प्रकाराने विदेशी लोकांनाही वेड लावले आहे. त्यामुळे सध्या जगभर ही शैली लोकप्रिय होत आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्गदर्शक
या गुरुकुलात बासरीचे धडे देणारे समीर इनामदार हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बासरीवादक आहेत. ध्रुपद शैलीत बासरीवादन करणारे ते भारतातील एकमेव वादक आहेत. त्यांनी तयार केलेल्या समीर फ्लूटची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली आहे. दुसरे मार्गदर्शक प्रदीपकुमार चोप्रा हेदेखील ध्रुपद शैलीत गायन आणि पखवाज वादनात माहीर आहेत.