आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpanchami Festival At Sangli District Battis Shirala

बत्तीस शिराळ्यातील पंचमी यंदा प्रथमच नागांशिवाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत जिवंत नागांच्या पूजेला फाटा देत बत्तीस शिराळा येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी नागप्रतिमा व मूर्तींचीच पूजा केली. वन्यजीव कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे नागपंचमीला जिवंत नागांची पूजा करण्याची प्रथा आहे. या प्रथेला 2002 मध्ये सांगलीतील निसर्गप्रेमी मंडळींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानुसार न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे काही बंधने घालत नागपंचमी प्रथेप्रमाणे साजरी करायला परवानगी दिली होती. दोन वर्षांपूर्वी शिराळा ग्रामपंचायतीने वन्यजीव (संरश्रण) अधिनियम 1972 हा शिराळकरांना लागू करू नये, या कायद्यातून सूट मिळावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली. ती फेटाळून लावत उच्च न्यायालयाने 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार नाग पकडण्यास बंदी असल्याचे सांगून प्रशासनाने या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी आणि शिराळकरांचे प्रबोधन करावे, असे आदेश दिले होते.
जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आणि पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी शुक्रवारी शिराळा येथे प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवला होता. अंबामाता मंदिरात जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा आहे; मात्र सकाळी नागमंडळाचे कार्यकर्ते मंदिरात आले. त्यांनी देवीचे दर्शन घेऊन गावातून फेरी कढली. त्यानंतर घरोघरी नागांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. दुपारी चार वाजता परंपरेप्रमाणे महाजन यांच्या घरातून नागमूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी या पालखीमागे नागांची मिरवणूक काढली जायची, या वर्षी मात्र मंडळांनी नागांचे प्रदर्शन केले नाही.

कायदा बदलावा
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार नाग पकडण्यास बंदी आहे; मात्र शिराळ्यात जिवंत नागांची पूजा करण्याची प्रथा ही बाराशे वर्षांपूर्वीची आहे. कायदा नंतर झाला आहे. त्यामुळे या कायद्यातून शिराळकरांना सूट मिळावी आणि जिवंत नागांची पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी शिराळा ग्रामस्थांच्या वतीने केंद्र सरकारकडे करणार असल्याचे सरपंच गजानन सोनटक्के यांनी सांगितले.