आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशालीनतेमुळेच महाराष्ट्रात पंतप्रधान घडला नाही- नाना पाटेकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- ‘स्थापनेपासून 60 वर्षांत राज्यातील एकही माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकला नाही. आपण अधिकच शालीन असल्याने मागे पडलो आहोत. आता जात्यंध शक्तींपासून सावध राहून पंतप्रधानपदासाठी रेटा लावला पाहिजे,’ असे मत प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी शनिवारी व्यक्त केले.सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथील महाकाली दूध संघाचे उद्घाटन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाना बोलत होते.‘पूर्वी हिंदू आणि मुस्लिम गुण्या-गोविंदाने राहायचे. दोन्ही धर्मांची शिकवण ही प्रेमाचीच आहे. दोन्ही धर्मीयांची गळाभेट होत असताना त्यांची हृदये भिडत होती; पण ते आता होताना दिसत नाही. याला जबाबदार कोण? देशात वाढत असलेल्या काही जात्यंध शक्ती समाजात फूट पाडत आहेत, त्यांच्यापासून सावध राहा,’ असा सल्ला पाटेकर यांनी उपस्थितांना दिला.
दुस-यांना पुढे करणे बंद करा
नाना म्हणाले, ‘गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्रात पंतप्रधानपदाच्या लायकीचा एकही माणूस घडला नाही का? आपली शालीनता ही सर्वात आड येणारी बाब आहे. खरे तर ही आपली ताकद आहे; मात्र आपण ऐनवेळी दुसयांना पुढे करतो. हे आता बंद करायची वेळ आली आहे. राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यंतरी केलेले ‘माजी मुख्यमंत्री यशवंतरावांची शालिनता आता उपयोगाची नाही’ हे वक्तव्य खरेच आहे, असे समर्थन करत नानांनी आजच्या राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर कोरडे ओढले.
भ्रष्ट नेत्यांना जाब विचारा
राजकारण्यांवर टीका करताना पाटेकर म्हणाले, निवडणुकीआधी सामान्य असलेला उमेदवार निवडून आल्यावर गडगंज होतो. त्याच्याकडे एवढी मालमत्ता येते कोठून, याचा जाब लोक विचारत नाहीत. त्यामुळेच त्यांना रान मोकळे मिळते आणि भ्रष्टाचार बोकाळतो. लोकांनीच आता नेत्यांना जाब विचारला पाहिजे. आर. आर. आबांसारख्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्यांच्या पाठीशी लोकांनी राहिले पाहिजे.’ पंतप्रधानपदापर्यंत महाराष्ट्रातील एकही नेता पोहोचला नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.