आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा ‘मैत्र’दिन : आभाराचा भार अन् शेजार्‍यांत जाणवलेला दुरावा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मी आभार मानतो,’ असे शब्द उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या तोंडून बाहेर पडले आणि जबाबदारी पार पाडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनीही राणे यांचे तोंडभरून कौतुक केले. मैत्रदिनाच्या मुहूर्तावर घडलेल्या या प्रसंगामुळे काँग्रेसमध्ये काही सकारात्मक घडत असल्याच्या आशा कार्यकर्त्यांच्या मनात पल्लवित झाल्या. पण दोन तासांच्या कार्यक्रमात शेजारी-शेजारी बसूनही चव्हाण आणि राणेंमधील दुरावा मात्र मिनिटागणिक जाणवत राहिला. आभाराचा हा ‘भार’ सोसतच मुख्यमंत्री मुंबईला रवाना झाले आणि राणे आपल्या पुढच्या निर्णायक ‘लढाई’साठी...!

मराठा महासंघाच्या अधिवेशनानिमित्त रविवारी चव्हाण, राणे आणि भाजप नेते विनोद तावडे यांचा कोल्हापुरात सत्कार ठेवण्यात आला होता. कार्यक्रमस्थळी आधी तावडे, नंतर राणे आणि सर्वात उशिरा मुख्यमंत्री आले. राणेंशेजारीच चव्हाणांची खुर्ची होती. चव्हाण आल्यावर राणेंसह सगळे उठले. चव्हाणांच्या हातात राणेंनी ‘हात’ दिला; परंतु तोही राखूनच. शेजारी बसूनही दोघांची तोंडे विरुद्ध दिशांना असल्याचे उपस्थितांना जाणवत होते. तावडेंशी बोलण्यासाठी चव्हाणांनी राणेंच्या समोरून वाकून संवाद साधला, पण तेव्हाही राणे मौनातच होते.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक : मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी म्हणून आम्ही मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राणेंवर दिली आणि त्यांनी राज्यभराचा दौरा करून अभ्यास करून हा अहवाल दिला, असे सांगत मुख्यमंत्र्यांनीही राणेंचे कौतुक केले.

राणेंचे ‘महत्त्वाकांक्षी’ संकेत
‘मराठा महत्त्वाकांक्षी असला पाहिजे’ या राणेंच्या वाक्याला टाळ्या पडल्या. तर ‘निर्णय घेताना परिणामांची चिंता करायची नसते. करू का नको असा विचार करत बसले तर कामे होत नाहीत’ अशा वक्तव्यांतून राणे यांनी जणू पुढच्या राजकीय वाटचालीचे संकेतच दिले.

आडून बोलणे आणि टाळ्या घेणे
- राणेंच्या आक्रमक भाषणाने मेळाव्यात चैतन्य आणि आणि टाळ्याही घेतल्या. पण या बोलण्यामागे संदर्भ मात्र वेगळा लावला जात होता.
- रक्त सळसळणारा तो मराठा. तो कधी अर्ज-विनंत्या करत नाही. जे मिळवायचं ते मिळवतो.
- खाईन तर तुपाशी अशी मराठ्याची वृत्ती असते. रडत बसत नाही. तक्रारी सांगत नाही. संघर्ष करतो.
(फोटो : कोल्हापुरातील मराठा महासंघ मेळाव्यात मुख्यमंत्री चव्हाण आणि राणे)