आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ. भा. मराठी नाट्यसंमेलन : पासच्या ‘प्रयोगा’ने रसिकांची अडवणूक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - 92 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे औपचारिक उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. संमेलन साहित्याचे असो की नाटकांचे, त्यास नेहमीच राजकीय वादाची किनार लाभलेली असते. यंदाचे नाट्यसंमेलन तरी त्याला कसे अपवाद राहील? संयोजन समितीने हे संमेलन वादातीत ठरवण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र तो फारसा यशस्वी झालेला नाही.
संमेलनाच्या मध्यवर्ती समिती आणि संयोजन समिती यांच्यात पुरेसा समन्वय नसल्याचे जसे दिसून आले तसेच स्वागताध्यक्ष पतंगराव कदम आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यातील सर्वश्रुत राजकीय संघर्षाचे सावटदेखील या संमेलनावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीत स्थानिक रसिक आणि कलावंतांची ससेहोलपट होत आहे. आता या संमेलनाचा सोपस्कार कसाबसा पार पाडायचा या तयारीने स्थानिक संयोजकांची धडपड चाललेली दिसते.
नाट्यसंमेलन हे सुसंस्कृत आणि मनाने रसिक, कलासक्त असलेल्या मंडळींसाठी मेजवानी ठरते. परंतु आता ‘पास’च्या आग्रहामुळे या मंडळींनादेखील ‘दुरून डोंगर साजरे’ म्हणण्याची वेळ आली आहे. व्यासपीठासमोरील निमंत्रितांच्या जागा वगळता उर्वरित संपूर्ण मंडप सामान्यांसाठी खुला असतो, तिथे त्यांना मुक्त प्रवेश दिला जातो. सांगलीत मात्र सर्वच ठिकाणी ‘पास’ सक्तीचा करण्यात आला आहे. मुळात सर्वच कार्यक्रम जनतेसाठी खुले ठेवण्याची स्थानिक संयोजन समितीची भूमिका होती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आदेशावरून पोलिसांचा फौजफाटा डेरेदाखल झाला. शुक्रवारी दुपारी श्वानपथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली, त्यापाठोपाठ दुपारी 5 वाजता सुमारे 250 पोलिसांची बालगंधर्वनगरीत सुरक्षा कवायत झाली. शनिवारी उद्घाटनाच्या सोहळ्यास कडक बंदोबस्त राहणार असल्याने सामान्य नागरिक आणि रसिकांना प्रवेश मिळेल का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

‘घाशीराम कोतवाल’चा प्रयोग बंदोबस्तातच
विष्णुदास भावे यांच्यापासून ते एकूणच सांगलीच्या नाट्यपरंपरेच्या इतिहासाचा पट उलगडून दाखवणाºया ‘आरंभ ते प्रारंभ’ या महानाट्याची रंगीत तालीम गुरुवारी रात्री आटोपली. यातील कलावंत आणि ही रंगीत तालीम पाहण्यासाठी आलेले स्थानिक नागरिक जेव्हा घरी जाण्यास निघाले त्या वेळी त्यांच्याकडे पोलिसांनी ‘पास’ची मागणी केली. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. मुळात संयोजन समितीच्या पदाधिकाºयांनी पासची काही गरज नाही, सर्व कार्यक्रम खुले राहतील, असे यापूर्वीच स्पष्ट केलेले असल्यामुळे सगळेच याबाबत अनभिज्ञ होते. दुसºया बाजूला भावे नाट्यमंदिरात ‘घाशीराम कोतवाल’चा प्रयोगही पोलिस बंदोबस्तातच झाला.

संयोजकांचे मध्यवर्ती समितीकडे बोट!
नाट्यसंमेलन यशस्वी व्हावे यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न केले आहेत. आम्हाला मध्यवर्ती समितीकडून जे निर्देश दिले जात आहेत, त्याचे आम्ही पालन केले आहे. आम्ही इथे काहीच करू शकत नाही. सगळे काही मध्यवर्ती समितीच ठरवते.’’
डॉ. दयानंद नाईक, अध्यक्ष, संयोजन समिती.