आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाता नाट्यपंढरीसी, सुख वाटे जीवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - जाता नाट्यपंढरीसी, सुख वाटे जीवा, आनंद सोहळा पाहतांचि ॥
अशा आनंदमय वातावरसंमेलनाचा औपचारिक उद्घाटन सोहळा शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यातच नाट्यपंढरी मानल्या जाणाºया सांगलीतील किर्लोस्करवाडीशी जन्मत:च ऋणानुबंध असलेल्या श्रीकांत मोघे यांच्याकडे नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा मावळते अध्यक्ष राम जाधव यांनी सोपवली हा रसिकांच्या दृष्टीने दुग्धशर्करा योगच ठरला.
अध्यक्षीय भाषण करताना श्रीकांत मोघे म्हणाले, नव्या महाराष्ट्रात कालचा हा मध्यमवर्ग खूपच बदलला आहे. याचा अर्थ केवळ आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेला वर्ग असाच नव्हे, तर नवं ऐकणारा, नवं पाहणारा, नवा विचार करणारा, जुनाटपणाला आव्हान देणारा असा
हा प्रेक्षकवर्ग आहे. 11 कोटी लोकसंख्या असलेल्या या महाराष्ट्रात हा वर्ग खरोखरीच मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्यामुळेच मराठी नाट्यक्षेत्राच्या दृष्टीने खूपच आशादायक वातावरण आहे. मराठी नाट्यलेखनाच्या इतिहासामध्ये जसा किर्लोस्कर, गडकरी, देवल यांच्यापासून पु. ल. देशपांडे, शिरवाडकर, कानेटकर, विजय तेंडुलकर यांनी एक ठसा उमटवला तो पुढे जाऊन रत्नाकर मतकरी, केदार शिंदे यांच्यापर्यंत प्रत्येकानं समर्थपणे आणि स्वतंत्र शैलीनं हाताळला आहे. स्त्री-भ्रूणहत्येवरील ‘स्त्री सुक्त’ हे योगेश सोमण यांचं पथनाट्य आधुनिक उदाहरण ठरू शकेल आणि अशी काही नवी नाटकं मराठी नाट्यविश्वातील बलस्थानं होत, असं मला वाटतं.
उद्घाटन सोहळ्यास येथील देवल स्मारक मंदिरच्या कलावंतांनी सादर केलेल्या ‘सौख्य सुधा वितरो सदा नव...’ आणि ‘नमन नटवरा विस्मयकारा...’ या नांदीने झाला, तर सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर, नंदिनी वैद्य यांनी केले. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि कृषिमंत्री शरद पवार यांच्या शुभेच्छांचे वाचनही केले. प्रास्ताविक स्मिता तळवलकर यांनी केले, तर नाट्यपरिषदेच्या उपक्रमाविषयीची माहिती नाट्यपरिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी दिली.
या वेळी राजाराम शिंदे, आशालता वाबगावकर, शोभना श्रीकांत मोघे, सुरेश खरे, लालन सारंग, अरुण दांडेकर, विजय पाटकर, पुष्कर श्रोत्री, कुमार सोहनी, प्रशांत दामले, वंदना गुप्ते, वामन केंद्रे, मोहन परब, त्यागराज खाडिलकर, सुनील तरे, स्मिता जयकर, सविता मालपे, शरद पोंक्षे, रमेश भाटकर, विजय कदम, बालगंधर्व स्मारक समितीचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्याप्रमाणेच संजय पाटील (बीड), राजाभाऊ मोरे (अमरावती), सुरेश गायधनी (नाशिक), यशवंत पद्मगिरवार (वाशीम) आणि नगरचे शिंगोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
बंदी आणून उपयोग काय?
खासगी आणि व्यावसायिक नाट्यसंस्था आणि नाट्यपरिषद यांच्यात सुसंवाद, समन्वय असायला हवा. मात्र, व्यावसायिक नाट्यसंस्थांच्या प्रयोगांवर बंदी आणण्याचा मुद्दा सतत चर्चेला येतो. अशा स्वरूपाची बंदी आणणे तसे शक्य नाही आणि बंदी आणून तरी उपयोग काय?
हेमंत टकले, अध्यक्ष, अ.भा.मराठी नाट्यपरिषद.
सांस्कृतिक खात्याचे विकेंद्रीकरण करा
सांस्कृतिक खात्याकडे मुळातच मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे त्याचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र कार्यालये स्थापन करावीत. या खात्याचा अशा पद्धतीने विस्तार झाल्याने महाराष्ट्रातील सांस्कृतिक उपक्रमदेखील प्रगल्भ होतील. प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला नाट्यगृहे उभारली जावीत. त्यातून ग्रामीण भागातील कलाविष्कार आणि नव्या पिढीतील कलावंतांची ओळख समाजाला होईल.
राम जाधव, मावळते अध्यक्ष