आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आम्ही साधू-संत आहोत काय? आरक्षण निर्णयाचा फायदा घेण्याचे पवारांचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - ‘मुख्यमंत्री बदलाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कधीही करण्यात आली नाही. उलट काँग्रेसमधीलच काही मंडळी यासंदर्भात चर्चेसाठी माझ्याकडे आली होती. शिवाय मुख्यमंत्री बदलाचा निर्णय हा कॉँग्रेसच्या अंतर्गत धोरणाचा भाग आहे, याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे,’ असे सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘मुख्यमंत्री बदलाच्या मोहिमे’ला आलेल्या अपयशानंतर हा विषय कॉँग्रेसकडे टोलवून मोकळे झाले. ‘मराठा व मुस्लिम आरक्षणाचा आम्हाला फायदाच होणार आहे,’ हे मान्य करून ‘त्याचा फायदा न घ्यायला आमची काय साधू-संतांची टोळी आहे काय?’ असा प्रतिप्रश्न पवारांनी पत्रकारांना केला.

पवारांनी गुरुवारी कराडमध्ये पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. ‘मुख्यमंत्री किती कार्यक्षम आहेत हे निवडणुकीनंतर नक्कीच कळेल, मात्र त्यांच्या कामकाजाची पद्धत सरसकट योग्यच आहे, असे नाही. या बाबत मतभेद असू शकतो. सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत ते सगळेच बरोबर नाहीच. मात्र काही मुद्दे योग्य आहेत, असे संदिग्ध उत्तर पवारांनी एका प्रश्नावर दिले.
मोदींची धरसोड वृत्ती
‘नरेंद्र मोदी सरकारच्या कामकाजाबाबत तातडीने प्रतिक्रिया देणे आता योग्य नाही. मात्र, त्यांच्या निर्णयात धरसोड वृत्ती दिसून येते. रेल्वेभाडे वाढवले, पुन्हा काही अंतरापर्यंत कमी केले. गॅसचे दर वाढवणे तसेच कमी करणे या त्यांच्या निर्णयातून मोदी ठामपणे काही निर्णय घेत नाहीत, असे सध्या म्हणता येईल’, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.
राज्यात लाट नाहीच
‘विधानसभेच्या निकालाबाबत आत्ताच कोणताही अंदाज काढणे योग्य नाही. मात्र, राज्यात जी लाट आहे असे म्हटले जाते तशी लाट कुठेच दिसत नाही. पश्चिम बंगाल, ओरिसात भाजपची लाट दिसली नाही. तशीच परिस्थिती राज्याच्या विधानसभा निवडणुकीत दिसून येऊ शकते. त्यामुळे राज्यातील विधानसभेचा अंदाज आता बांधणे उचित होणार नाही,’ असे पवार म्हणाले.

लिंगायत समाजाची मागणी
निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मराठा व मुस्लिम आरक्षणाची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ही मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही पावले उचलली आहेत. लिंगायत समाजानेही आरक्षणासाठी मागणी केली आहे, हे वास्तव आहे. त्यांची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवली असून याबाबत केंद्र सरकारच आता निर्णय घेईल, असे पवार म्हणाले.

बंडखोरांमुळे पुण्यात पराभव
पुणे पदवीधर मतदारसंघातून राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे पुत्र व राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील यांचा पराभव झाला. याचे कारण आमच्यातील बंडखोरी होती. तसे झाले नसते तर आमचा विजय नक्की होता. याचे कारण आमच्या दोन्ही उमेदवारांच्या मतांची बेरीज विजयी उमेदवाराला पडलेल्या मतांपेक्षा जास्त आहे, असे पवारांनी सांगितले. बंडखोरांबाबत काय निर्णय घेणार? या प्रश्नावर त्यांनी ‘याचे उत्तर आम्ही तुम्हाला का द्यायचे?’ असा प्रतिप्रश्न केला.
छायाचित्र - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी कराडमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती.