आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजेंशी जुळवून घेण्‍याचा पक्षाचा प्रयत्‍न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- सातारा जिल्हा बँक निवडणूक तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साता-याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यात बुधवारी सुमारे दोन तास चर्चा झाली. असे असले तरी उदयनराजे कोणत्या अटी, शर्थीवर राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेणार हे मात्र दोन्ही बाजूंकडून स्पष्ट झाले नाही.
उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले असले तरी ते केवळ शरीराने पक्षात आहेत. आजवर त्यांनी अनेक वेळा पक्षाच्या नेत्यांवर टीका करून आपले वेगळे अस्तित्व दाखवून दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व उदयनराजे यांचे ‘सख्य’ही जगजाहीर आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार शिंदे हे पवारांचे समर्थक आहेत. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा प्रभाव सर्वाधिक असताना उदयनराजेंनी मात्र स्वत:चे अस्तित्व नेहमीच पक्षापेक्षा वेगळे व वरचढ ठेवले आहे. छत्रपती शिवरायांचा वारसा ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मागील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून कराडचे आमदार बाळासाहेब पाटील यांना आस्मान दाखवले होते.
मागण्यांचा विचार होईल
आ. शशिकांत शिंदे म्हणाले की, उदयनराजे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच आदर आहे. अशा व्यक्तीला पक्षाच्या कार्यात आणि जबाबदारीच्या ठिकाणी नियुक्त केले, सल्ला घेतला तर आम्हाला त्याचा उपयोगच होणार आहे. त्यांच्या पक्षाकडे कांही मागण्या आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात सामील करा, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या विचारांची पक्ष नक्कीच दखल घेतली जाईल. खासदार उदयनराजे म्हणाले की, आमदार शिंदे यांच्याशी सातारा, कोरेगावच्या विकासावर चर्चा केली. माझ्या कार्यकर्त्यांना मुख्या प्रवाहात आणण्यासंबंधी बोलल्याचे ते म्हणाले.