आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगली - स्त्री भ्रूणहत्या करणारे डॉक्टर आणि पालक कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत, असा कायदा राज्य शासन लवकरच करेल, अशी ग्वाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात दिली.
पाटील म्हणाले, ‘‘शिक्षणाने लोक शहाणे होण्यापेक्षा अधिकच प्रतिगामी होत चालले आहेत. महाराष्ट्रात शिक्षणाचे प्रमाण कमी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मुलींची संख्या जास्त आहे; पण याउलट स्थिती सधन आणि सुस्थितीतील जिल्ह्यांची आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी आता कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे. स्त्री भ्रूणहत्या करणारे डॉक्टर किंवा पालक कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत, असा कठोर कायदा करण्यासाठी शासन पावले उचलेल.’’
‘‘राज्यात मुलींचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही विधानसभा निवडणुकीत जन्माला येणा-या प्रत्येक मुलीच्या नावे ठरावीक रक्कम ठेवण्याचे वचन दिले होते. त्याची पुर्तता करण्यासाठी आम्ही लवकरच त्याबाबतचा निर्णय घेत आहोत. मुलगी 20 वर्षांची झाल्यावर तिच्या नावे 1 ते दीड लाख रुपये असतील, एवढी रक्कम आम्ही यापुढे जन्मणा-या मुलीच्या नावे ठेवणार आहोत.’’
....तर सन्याशांची फौज तयार होईल
स्त्री भ्रूण हत्येचे सत्र असेच सुरू राहिले तर महाराष्ट्रात सन्याशांची फौज तयार होईल आणि ही फौज जेवढ्या आहेत, तेवढ्या मुलींचे जगणेही कठीण करेल. उद्या कदाचीत मुलं सरकारकडे मुलींची मागणी करतील, असेही आर.आर.पाटील म्हणाले.
‘मेरीट’वरच पदे
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्याच्या निमित्ताने आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता हिचा सक्रिय राजकारणातील प्रवेश आणि युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तिच्यावर सोपवली जाईल, अशी चर्चा होती. पण आर.आर.पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणालाही ‘मेरीट’वरच पदे मिळाल्याचे सांगून ‘चांगले काम करणा-या सामान्य कुटूंबातील तरुणींना निश्चित पक्षात संधी मिळेल. राजकीय नेत्यांच्या मुलांच्या महत्वाकांक्षा त्यांच्या आड येणार नाहीत’ असे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कार्यकारिणी वर्षभरानंतर - सुप्रिया सुळे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.