कोल्हापूर - कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात श्रीपुजकानी देवीच्या मूर्तीवर पारंपारिक वेशभूषा सोडून एक दिवस चक्क देवीला 'घागरा-चोळी' परिधान केल्याने उठलेले वादंग अद्याप शमलेले नाही. आता श्रीपुजक आणि अंबाबाईच्या भक्तांमध्ये सुरु असलेला हा वाद उलट वाढतच चालला आहे. आज तर अंबाबाईच्या आणि शाहू महाराजांच्या भक्तांनी श्री करवीरनिवासिनी अंबाबाईच्या हक्कदार श्रीपूजक मंडळाने एका प्रसिद्धी पत्रकात राजर्षी शाहू महाराज यांच्या वटहुकुमाला तथाकथित असा शब्द वापरल्याने आणि देवीला घागरा चोळी परिधान केल्याने आई अंबाबाईलाच या आंध्रप्रदेशातून तुझ्या पूजेसाठी आणलेल्या श्रीपुजकांना सुबुद्धी दे आणि तुझ्या गाभाऱ्यातून बाहेर काढ अशा मागणीचे साकडे घातले.
सकाळी साडेदहा वाजता मोठ्या संख्येने देवीभक्त या आंदोलनात सहभागी झाले होते.
तसेच जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांत बैठक न बोलविल्यास मंदिराचे चारही दरवाजे बंद करून श्रीपूजकांना आत जाण्यास मज्जाव करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
पत्रकार आणि धार्मिक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सुभाष देसाई यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेवून अंबाबाईचे श्रीपुजक हे सरकारचे नोकर आहेत. त्यांना मंदिरातील उत्पन्न घेण्याचा अधिकार नाही. अशा आशयाचा वटहुकुम करवीरचे तत्कालीन छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी १४ मे १९१३ रोजी काढला होता. या वटहुकुमाच्या आधारे अंबाबाईचे पुजारी पंढरपुरातील पुजाऱ्यांप्रमाणे सरकारी नोकर मानले जावेत अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे सांगितले होते.
देसाई यांच्या मागणीचे खंडन करणारे प्रसिद्धी पत्रक काढून १९१३ सालचा तथाकथित वटहुकुम न्यायालयीन निर्णयानुसार गैरलागू असल्याचे परिपत्रक काढून त्यामध्ये उपरोक्त वटहुकुमावरून एका अधिकाऱ्याने श्रीपुजकांना नोटीस काढली होती व त्याविरुद्ध काही श्रीपुजकानी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी न्यायालयाने या वटहुकुमाच्या वैधतेबाबत शंका उपस्थित केली होती. हा वटहुकुम नंतर खालसा झालेल्या तत्कालीन प्रशासनाने काढलेला आहे. त्यामुळे वैध असला तरी तो गैरलागू असल्याचे निकालपत्रात नमूद केल्याचे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते. त्यामुळे तथाकथित वटहुकुमावरून पुजाऱ्यांना सरकारी नोकर ठरवणे हास्यास्पद असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कोल्हापुरातील शाहूप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या असल्याचे मत व्यक्त करून देवीला घागरा चोळी नेसवणाऱ्या आणि राजर्षी शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या श्रीपुजकांना आई आंबे आता तूच सुबुद्धी दे आणि तुझ्या गाभाऱ्यातून बाहेर काढ या मागणीचे साकडे आज अंबाबाईला घालण्यात आले.
या आंदोलनात प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, स्वाभिमान संघटनेचे सचिन तोडकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, शिवसेना शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस, इंद्रजीत सावंत आदींसह अंबाबाई भक्त आणि शाहू महाराजांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा...
पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्....