आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातांच्या कुशीत कायमचे विसावले शहीद महाडिक, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नल संताेष महाडिक यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचा मुलगा, भाऊ, मुलगी पत्नी स्वाती. - Divya Marathi
कर्नल संताेष महाडिक यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचा मुलगा, भाऊ, मुलगी पत्नी स्वाती.
सातारा- अवघ्याआठशे ते हजार लोकवस्ती असलेल्या सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावात भूमिपुत्र भारतमातेच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या कर्नल संताेष महाडिक यांना अखेरचा निराेप देण्यासाठी गुरुवारी सकाळपासून हजाराेंच्या संख्येने जनसमुदाय जमला हाेता. ‘शहीद कर्नल महाडिक अमर रहे’च्या घाेषणांनी सारा गाव दुमदुमत हाेता. अवघ्या सहा वर्षांच्या स्वराजने जेव्हा आई स्वाती आणि नऊ वर्षांची बहीण कार्तिकीच्या देखत आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थितांच्या भावनांचा अक्षरश: बांध फुटला. ‘माझ्या काळजाचा तुकडा गेला..’ असा संताेष यांच्या माताेश्री कालिंदीबाई यांनी फाेडलेला हंबरडा जणू अासमंत चिरून गेला. भारतमातेचा हा सुपुत्र आपली अाई कालिंदी, जिच्याकडे संताेष दत्तक गेले हाेते, ती माउली बबई यांच्यासह ज्या शाळेने देशभक्तीचे बाळकडू पाजले, त्याच मातृरूपी वास्तूच्या प्रांगणात अनंतात विलीन झाला.
पोगरवाडी येथे गुरुवारी दुपारी १२ वाजता शहीद संतोष महाडिक यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव बुधवारी रात्रीच सातारा येथे आणले हाेते. गुरुवारी सकाळी लष्कराच्या सजवलेल्या वाहनातून पार्थिव पोगरवाडीला नेण्यात आले. वेशीपासून कर्नल महाडिक यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या न्यू इंग्लिश हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात अंत्यसंस्काराच्या चौथऱ्यापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात अाली. छाेट्याशा गावाच्या रस्त्यावर जागोजागी आदरांजली वाहणारे फलक तर होतेच, पण पोगरवाडीतल्या प्रत्येक घरासमोर आणि सुमारे दोन किमीपर्यंत फुलांच्या पायघड्या अंथरलेल्या होत्या.
युद्ध जिंकून परतणाऱ्या विजेत्याप्रमाणे गावातील प्रत्येक घरासमाेर रांगाेळी काढून या वीर जवानाला निरोप देण्याची तयारी करण्यात अाली होती. मात्र, प्रत्येकाच्या मनात आपला सेनानी, गावात रमणारा बाळा गमावल्याची अपार खंतही दिसत हाेती. ठिकठिकाणी पार्थिवावर फुले उधळली गेली, औक्षण करण्यात आले. अखेरीस सुमारे दीड तासाने अंत्ययात्रा शाळेच्या प्रांगणात केलेल्या चौथऱ्यापर्यंत आली. हजारो जणांचा समुदाय साश्रुनयनाने कर्नलना निरोप देण्यासाठी थांबला होता.

चौथऱ्यापासून काही अंतरावर लष्कराच्या तिन्ही दलांच्या जवानांनी संताेष यांचे पार्थिव खांद्यावर घेतले. या वेळी लष्कराच्या बँड पथकाने बिगुलवर अंत्यसंस्काराच्या वेळी वाजवली जाणारी ‘लास्ट पोस्ट’ ही धून वाजवली. युद्धात पराक्रम गाजवलेला जवान शहीद झाल्यावर तो विश्रांतीसाठी जात असल्याची भावना या धुनीमधून अत्यंत गंभीरपणे प्रतीत होत होती. त्याच वेळी मंत्रोच्चारणात कर्नल महाडिक यांचा मुलगा स्वराज याने अबोध, निरागसपणे पित्याला मुखाग्नी दिला. मुलगी कार्तिकीला आपल्या वडिलांबरोबर काहीतरी अघटित घडले आहे याचा अंदाज आल्याने ती आईला कवटाळून हमसून हमसून रडत हाेती.

वातावरण सुन्न झाले होते. याच वेळी ‘माझ्या काळजाचा तुकडा गेला...’ असा हंबरडा संताेष यांच्या अाई कालिंदीबाईंनी फाेडला अन‌् उपस्थितांच्या अश्रूंच्या बांध फुटला. संताेष यांचे बंधू जयवंत, अजय, भगिनी विजया, नातेवाइकांनाही भावना आवरणे अवघड झाले, तर दुसरीकडे संतोष पंचत्वात विलीन झाले. २१ लष्करी जवानांनी प्रत्येकी तीन फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना दिली.

माझी मुले देशासाठी देईन, वीरपत्नीचा पर्रीकरांना शब्द
संरक्षणमंत्रीमनोहर पर्रीकर यांनी सकाळी आरे येथे जाऊन वीरपत्नी स्वाती यांची भेट घेतली. ‘कर्नल महाडिक यांचे काम अतुलनीय आहे. महाडिक कुटुंबावर आलेला प्रसंग पेलता येणारा आहे, मात्र भारत सरकार, लष्कर आणि देश तुमच्याबरोबर आहे,’ असा विश्वास देत पर्रीकर यांनी महाडिक कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी स्वाती यांनी ‘माझ्या पतीप्रमाणे माझी दोन्ही मुले लष्करातच सेवा करतील,’ असे ठामपणे सांगून कर्नल महाडिक यांनी कुटुंबीयांच्या मनात बिंबवलेल्या देशप्रेमाची जणू साक्षच दिली. पोगरवाडी येथे पालकमंत्री विजय शिवतारे, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे शाहू महाराज, खासदार उदयनराजे भोसले, लष्कराच्या वतीने अॅडमिरल पवार, जिल्हाधिकारी अश्विन मुद््गल तसेच पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.