आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुटीचा गाेरखधंदा: कानडी विद्यापीठाकडून ६४ काेटी रूपयांचा गंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - कर्नाटक मुक्त विद्यापीठाने पदव्यांचा बाजारच मांडल्याचे समोर येत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता रद्द करूनही महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी या विद्यापीठाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची केंद्रे सुरूच ठेवली आहेत. अभियांत्रिकी पदविका घेऊन पदोन्नती मिळवण्यासाठी वीज महावितरण कंपनीत काम करणाऱ्या सुमारे अाठ हजार कर्मचाऱ्यांनी या विद्यापीठातील अभ्यासक्रमाला प्रत्येकी तब्बल ८० हजार रुपये शुल्क भरून प्रवेश घेतले आहेत. या कर्मचाऱ्यांचीही तब्बल ६४ काेटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे त्यांनी या विद्यापीठाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

‘दिव्य मराठी’ने बुधवारच्या अंकात ‘चित्रकलेचा कानडी मुक्त बाजार यूजीसीकडून बंद’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध करताच या विद्यापीठाकडून फसवणूक झालेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधून माहिती दिली. चित्रकलेच्या अभ्यासक्रमाबरोबरच कर्नाटक मुक्त विद्यापीठाने अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची केंद्रेही महाराष्ट्रात सुरू केल्याचे समोर आले. वास्तविक अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची परवानगी असणे बंधनकारक आहे; पण अशी कोणतीही परवानगी या विद्यापीठाने घेतली नसल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदोन्नती मिळते. संबंधित खात्याची परवानगी घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. मात्र, बहिस्थ तांत्रिक शिक्षण देणारे अभ्यासक्रम महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यापीठामार्फत उपलब्ध नाहीत. हे अभ्यासक्रम तांत्रिक आणि प्रात्यक्षिकावर आधारित असल्याने त्यांना परवानगीही मिळत नाही. या परिस्थितीचा गैरफायदा उचलत कर्नाटक मुक्त विद्यापीठाने असे अभ्यासक्रम महाराष्ट्रात सुरू केले आहेत. या विद्यापीठाला तांत्रिक अभ्यासक्रमासाठी एकट्या महाराष्ट्रात अाठ हजारांच्या आसपास कर्मचाऱ्यांनी प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे. यात वीज कंपनीतील सर्वाधिक कर्मचारी अाहेत.
स्वप्नांवर पाणी फेरले
‘कर्नाटक विद्यापीठाची मान्यता रद्द झाल्याची आम्हाला कोणतीही कल्पना केंद्रचालकांनी दिली नाही. मान्यता रद्द झाल्यावर वर्षानंतर आम्ही प्रवेश घेतला तरीही त्यांनी आम्हाला काहीच कल्पना दिली नाही. कर्नाटक मुक्त विद्यापीठाने आमच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. त्यामुळे आम्ही याविरोधात न्यायालयात जाणार आहोत,’ अशी माहिती मराठवाड्यातील एका कर्मचाऱ्याने दिली.
न्यायालयात जाणार
‘आम्ही अभियांत्रिकी पदविका मिळवण्यासाठी कर्नाटक मुक्त विद्यापीठाकडे दोन वर्षांची मिळून ८० हजार रुपये फी भरली आहे. महाराष्ट्रात अशी फसवणूक झालेले अाठ हजारांवर कर्मचारी आहेत. आम्ही एकत्रित न्यायालयात जाण्याच्या विचारात आहोत, अशी प्रतिक्रिया काेकणातील एका उमेदवाराने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.
दाेन वर्षांसाठी एेंशी हजारांवर शुल्क
तांत्रिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून दोन वर्षांचे मिळून ८० हजार रुपये विद्यापीठ घेते. विद्यापीठ अनुदान आयोगाने सन २०१२- १३ पासून या विद्यापीठाचे सर्व अभ्यासक्रम नियमबाह्य ठरवल्यानंतरही हे कोर्सेस सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांकडून फीदेखील घेण्यात आली. मात्र, दोन वर्षांत विद्यार्थ्यांना चारपैकी एकाही सत्र परीक्षेचे ना गुणपत्र मिळाले ना पदविका प्रमाणपत्र. त्यामुळे फसवणूक झालेल्या या कर्मचाऱ्यांनी काेर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तूर्त तरी अापली नावे उघड करण्यास ते तयार नाहीत.
कैफियत अामच्याकडे मांडा
‘यूजीसी’ने मान्यता रद्द केल्यानंतरही कर्नाटक मुक्त विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बिनदिक्कत प्रवेश देऊन त्यांच्याकडून लाखाे रुपये उकळले अाहेत. याबाबत फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी, कर्मचाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’कडे कैफियत मांडल्यास त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले जाईल.