आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी वाऱ्यावर : कर्नाटक मुक्त विद्यापीठाचे २०५ केंद्रांशी करार रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाने यूजीसीच्या नियमांचे पालन करून तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम बंद ठेवण्याचे तसेच यापुढे कर्नाटक राज्यापुरतेच नियमित अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचे प्रतिज्ञापत्र विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) सादर केले आहे. या पत्राच्या आधारे त्यांनी २०१५-१६ च्या शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. राज्याबाहेरील २०५ केंद्रांशी असलेले करारही विद्यापीठाने रद्द केले आहेत.

कर्नाटकातील एका इंग्रजी दैनिकात २७ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात कर्नाटक मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू एम. के. कृष्णन यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यापीठाने यूजीसीकडे नव्याने अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी मागितल्याची माहिती दिली आहे. यूजीसीच्या नियमांनुसार, विद्यापीठाने पॅरामेडिकल कोर्सेस यापूर्वीच बंद केल्याचे त्यांनी सांगितले. सर्व तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करत असल्याचे प्रतिज्ञापत्र यूजीसीला सादर केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यूजीसीच्या २०१३ च्या नव्या निकषांनुसार राज्याबाहेरील केंद्रेही बंद करण्याची तयारी कर्नाटक मुक्त विद्यापीठाने दर्शवली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे.
यूजीसी मान्यतेनंतरच प्रवेश
कर्नाटक मुक्त विद्यापीठाची बाहेरील राज्यांत २०५ दूरस्थ अभ्यास केंद्रे सुरू होती. ही सर्व केंद्रे बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याचे कुलगुरू कृष्णन यांनी सांगितले आहे, तर गुजरातमधील एका संस्थेचा करार रद्द करताना त्यांची विद्यापीठाकडे असलेल्या रकमेपैकी काही रक्कम परत दिल्याचेही कृष्णन यांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. राज्यातील २३ केंद्रांमध्ये सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश दिला जाईल, असे कृष्णन यांनी म्हटले असले तरी यूजीसीच्या पुढील मान्यतेशिवाय या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.
केरळमधील संस्थांची न्यायालयात धाव
कर्नाटक मुक्त विद्यापीठाने करार रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला केरळमधील एका संस्थेने तिथल्या न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने करार रद्दच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. महाराष्ट्रातील एकाही संस्थेने कर्नाटक मुक्त विद्यापीठाविरोधात आवाजही काढला नाही, याचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यूजीसीकडून मान्यता रद्द झाल्याने नागपूरचे केंद्र दोन वर्षांपासून बंदच
नागपूर - विद्यापीठ अनुदान आयोगाने कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाची मान्यता रद्द केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी नागपुरातील विद्यापीठाचे अभ्यास केंद्र बंद करण्यात आले. ज्या ठिकाणी हे केंद्र सुरू होते. त्या इमारतीमध्ये आता कॉनकोर्स एज्युकेशन या सॉफ्टवेअरचे अभ्यासक्रम देणाऱ्या कंपनीचे कार्यालय सुरू झाले. या कार्यालयातील स्वागत कक्षावरील महिलेने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक विद्यापीठाचे काम दोन वर्षांपूर्वीच बंद झाले असून नागपुरात एकाही विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारण्यात आले नाहीत. "दिव्य मराठी'चा प्रतिनिधी एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या हेतूने चौकशी करण्यासाठी गेला असता ही माहिती मिळाली; परंतु या इमारतीवर आजही कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाचे फलक झळकत आहे.
फलक लवकरच काढण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.