आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- एकीकडे विविध धार्मिक विधींची लगबग, खड्या आवाजात चाललेले मंत्रोच्चार अशा वातावरणामध्ये श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेला शनिवारी प्रारंभ झाला. औरंगाबादहून आलेले पुरातत्त्व विभागाचे पथक शनिवारी पहाटे कोल्हापुरात दाखल झाले आणि सकाळी मंदिरामध्ये येऊन त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. शनिवारी यज्ञमंडपामध्ये सहस्रचंडी, महानुष्ठानाचा व लक्ष श्रीसूक्त पठणाचा दुसरा दिवस होता. सलग साडेसहा तास पाठवाचन झाले. तसेच श्री शाहू वैदिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रीसूक्त पठण केले. त्रिगुणात्मिका श्री अंबाबाईच्या एका स्वरूपाचे म्हणजेच श्री महाकालीचे विधान ऋतुजा मुनीश्वर व मनोज मुनीश्वर यांच्या यजमान पदाखाली पार पडले. याच दरम्यान पुरातत्त्व खात्याच्या तज्ज्ञ पथकाचे सकाळी ११ वाजता मंदिरात आगमन झाले. यात पथकाचे प्रमुख डॉ.एम.के.सिंग व त्यांच्या सहा सहकाऱ्यांकडून त्यांच्या साहित्याचे संकल्पोक्त पूजन करण्यात आले.
त्यानंतर श्रीपूजक मयूर मुनीश्वर यांनी विधिवत श्रीफळ पानसुपारी देऊन त्यांना संवर्धन प्रक्रिया करण्याचे आवाहन केले. त्यानंतर मूर्ती पुरातत्त्व खात्याकडे सोपवण्यात आली. या वेळी देवस्थान समितीचे संगीता खाडे, साळवी, हवालदार यांच्यासह श्रीपूजक आदी उपस्थित होते.