आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरचे महापौरपद काँग्रेसकडेच, उपमहापौरपद राष्ट्रवादीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेच्या ४३ व्या महापौर म्हणून काँग्रेसच्या अश्विनी अमर रामाणे यांची तर चाळीसव्या उपमहापौर म्हणून राष्ट्रवादीच्या शमा सलीम मुल्ला यांची साेमवारी बहुमताने निवड झाली. दोन्ही काँग्रेसचा विजय निश्चित असल्याने भाजप-ताराराणी आघाडीसोबत राहून मतदान करण्यापेक्षा शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी महापौर निवडीवेळी गैरहजर राहणे पसंत केले. भाजप-ताराराणी अाघाडीच्या सविता भालकर व राजसिंह शेळके यांचा पराभव झाला. या दाेघांनाही प्रत्येकी ३३ मते पडली.

८१ नगरसेवकांपैकी दोन्ही काँग्रेसच्या चिन्हावर ४२ जण निवडून आले, तर दाेन अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता. भाजप-ताराराणी आघाडीचे ३२ जण निवडून आले असून त्यांना एका अपक्षाने पाठिंबा दिला. भाजपचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘चमत्कारा’ची भाषा केली होती. परंतु जादुई अाकड्याचे गणित जुळत नसल्याचे लक्षात येताच दोन दिवसांपूर्वीच त्यांनी विराेधी बाकावर बसण्याची तयारी असल्याचे जाहीर केले हाेते.

दरम्यान, साेमवारी दोन्ही काँग्रेसने व्हीप जारी केल्याने आणि शिवसेनेच्या ४ नगरसेवकांनी गैरहजर राहत निवडीचे मताधिक्य वाढवण्यातच मदत केल्याने दोन्ही काँग्रेसचे उमेदवार ११ च्या फरकाने निवडून आले. जिल्हाधिकारी डाॅ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत निवडणूक सचिव उमेश रणदिवे यांनी ही प्रक्रिया पार पडली.