आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समीरला कर्नाटकात नेणार, कलबुर्गींच्या हत्या प्रकरणात दुसऱ्या दिवशीही कसून चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याची कर्नाटक पोलिसांकडूनही गेल्या दोन दिवसांपासून कसून चौकशी केली जात अाहे. कर्नाटकातील माजी कुलगुरू एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणात समीरचा हात असल्याचा तेथील पोलिसांना संशय आहे. त्यामुळे अधिक चौकशीसाठी समीरला कर्नाटकातही नेले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
कर्नाटक सीआयडीचे अधीक्षक एस. राजप्पा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक सोमवारीच कोल्हापुरात दाखल झाले आहे. दोन दिवस त्यांनी समीरची कसून चौकशी केली. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांची हत्या एकाच प्रकारे झाल्यामुळे कर्नाटकातील गुन्ह्यातही समीरचा हात असल्याचा संशय बळावला आहे. या पार्श्वभूमीवर अधिक चौकशीसाठी समीरला काही दिवसांसाठी कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केले जाऊ शकते, मात्र त्यासाठी न्यायालयाची परवानगी मिळणे आवश्यक आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
तसेच मडगाव बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्र पाटील व त्याचा साथीदार प्रवीण लिमकर याचाही पोलिस युद्धपातळीवर शोध घेत आहेत.

ती महिला कोण?
पानसरे यांच्या हत्येचा कट कर्नाटकातील संकेश्वरमध्ये रचला गेल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. संकेश्वर हे गाव समीर गायकवाडचे आजोळ असून तिथेच त्याचा सनातन संस्थेची संबंध आला होता. दरम्यान, जानेवारी महिन्यात या गावात झालेल्या एका गाेपनीय बैठकीत या हत्येचा कट आखण्यात आला होता, त्याला एक महिलाही हजर हाेती, अशी सूत्रांची माहिती आहे. पोलिस पथक या महिलेचा शोध घेत आहेत.

धमकी हा वागळेंचा स्टंटच : सनातन
पत्रकार निखिल वागळेंना आम्ही कोणतीही धमकी दिलेली नाही. केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी ते धमकीची
आवई उठवत आहेत, असे स्पष्टीकरण सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. ‘वागळेंनी नेहमीच आमच्याविरोधात लिखाण केले, अगदी आम्हाला दहशतवादीच ठरवले. मात्र, तरीही आम्ही कदापि त्यांना धमकी दिलेली नाही,’ असा पुनरुच्चारही त्यांनी केला. मडगाव बॉम्बस्फोटात फरार असलेला रुद्र पाटील याच्याशआआमचा आता काहीही संबंध नाही किंवा अामच्यापैकी कोणी त्याच्या संपर्कातही नाही. रुद्र पाटील याने सच्चर समितीच्या अहवालाला अाव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली हाेती. तेव्हापासून राज्य सरकार त्याच्या विरोधात आहे. पाटीलच्या वकिलाने अनेकदा न्यायालयात असे नमूद केले आहे की, ‘सरकारविरोधात याचिका दाखल केल्यामुळे सरकार खाेट्या अाराेपाखाली अटक करून डांबेल, अशी भीती रुद्र पाटील यांना वाटत अाहे.’ याकडेही मराठे यांनी लक्ष वेधले.
प्रवीण लिमकरच्या नातलगांचीही चौकशी

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास पथकाने मडगाव स्फोटातील आणखी एक फरार संशयित प्रवीण लिमकर याच्या नातेवाइकांची चौकशी केली. दरम्यान, कर्नाटक पोलिसांचे पथकही त्यांच्या घरी चाैकशीसाठी येणार असल्याचे वृत्त आहे.
विशेष पथकाने अटक केलेेला संशयित अाराेपी समीर गायकवाड याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रुद्र पाटील हाच या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. रुद्र हा मडगाव बॉम्बस्फोटप्रकरणी संशयित असून तो फरार आहे. त्या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील ढालगाव येथील आणखी एक फरार असलेला संशयित प्रवीण लिमकर याचा या प्रकरणाचा संबंध आहे का, याची चाचपणी पोलिस करत आहेत. त्यादृष्टीने एनआयएचे पथक ढालगाव येथे आले होते. त्यांनी लिमकर याच्या नातेवाइकांची
चौकशी केली. तसेच त्याच्या घराची झडती घेतली.