आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी शासन योजनांची अंमलबजावणी करा- प्रधान सचिव शाम तागडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी शासन राबवित असलेल्या योजनांची सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे निर्देश अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे यांनी आज (बुधवारी) शिवाजी सभागृह येथे बोलतांना दिले.
  
अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत शाम तागडे बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियेाजन अधिकारी सरिता यादव, पोलीस उपअधिक्षक सतीश माने, प्रकल्प संचालक डॉ. हरिश जगताप, जिल्हा प्रकल्प अधिकारी नितीन देसाई, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी. बुटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. भालेराव यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
      
अल्पसंख्याक समुदायासाठीच्या योजनांचा दोन-तीन महिन्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा असे सांगून तागडे म्हणाले, अल्पसंख्याक समुहासाठी शिक्षण, वसतीगृह, घरकूल, शिष्यवृत्ती, विविध बँकांकडील कर्जप्रकरणे, बचतगट अशा अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. बँकांनी अल्पसंख्याक समुहासाठीची कर्जप्रकरणे प्राधान्य क्रमाने मंजूर करावीत तसेच अल्पसंख्याकांसाठी घरकुलांचे प्रस्तावही प्राधान्य क्रमाने मार्गी लावावेत अशी सूचनाही त्यांनी केली.
  
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळांने त्यांच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजना तसेच थेट कर्ज योजनेची अंमलबजावणी करुन अल्पसंख्याकांना सहाय्यभूत ठरावी या महामंडळाच्या सक्षमी करणासाठी शासनाने प्राधान्य दिले असल्याचेही प्रधान सचिव शाम तागडे म्हणाले.
   
अल्पसंख्याक समुहातील मुलींसाठी राजाराम महाविद्यालय येथे वसतीगृह असून या वसतीगृह सुविधेचा जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुहातील मुलींनी लाभ घ्यावा असे आवाहनही प्रधान सचिव शाम तागडे यांनी केले. या वसतीगृहाची क्षमता 100 मुलींची असून पात्र मुलींनी वसतीगृह प्रवेशासाठी प्राचार्य, राजाराम महाविद्यालय कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव वेळीच मार्गी लावावेत तसेच पोषण आहार योजनेचीही प्राधान्याने अंमलबजावणी करावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
  
या प्रसंगी अल्पसंख्याक समुहासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा प्रधान सचिव शाम तागडे यांनी आढावा घेतला. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी स्वागत करुन बैठकीचे विषय विशद केले.
बातम्या आणखी आहेत...