आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेंटेनन्स वाढलेले आघाडी सरकार एकदाचे भंगारात काढा : गडकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - एखादे वाहन १५ वर्षे झाले की परवडत नाही म्हणून भंगारात काढले जाते. तसे आता आघाडी सरकारचा मेंटेनन्स वाढला आहे, ते अ‍ॅव्हरेजही देत नाही, त्याला भंगारात काढा, असे आवाहन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.

तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री अजित घोरपडे यांनी कवठे महांकाळ येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभही झाला. त्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात गडकरी बोलत होते. ‘केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. रस्ते विकासासाठी केवळ महाराष्ट्रात आम्ही ४० हजार कोटी रुपये दिले. देशभरातील सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी प्रधानमंत्री सिंचन योजना सुरू केली. वाजपेयींचे सरकार असताना सात हजार कोटींची प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आखली. त्यामुळे लाखो खेडी रस्त्याने जोडली गेली. महाराष्ट्रातील कृष्णा खोरे सिंचन योजनाही आम्हीच सुरू केली; पण राज्यातील आघाडी सरकारने पंधरा वर्षांत काहीही केले नाही. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना तीनदा निवडून दिले त्यांनी तुमचा विश्वासघात केला,’ अशी टीका गडकरी यांनी केली.

काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करताना गडकरी म्हणाले, ‘उसापासून इथेनॉलसारखे इंधन तयार होत असताना काँग्रेस सरकारने लाखो कोटी डॉलर्स खर्चून तेल आयात केले. इथेनॉलच्या वापरामुळे उसाला चांगला दर मिळाला असता. पण सरकारला हे नको होते. म्हणून आम्ही आता इथेनॉलचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात रस्त्याकडेला भांडवलदारांचे नाही तर शेतकर्‍यांचे पेट्रोल पंप तुम्हाला दिसतील. शेतकरी स्वत:च इथेनॉलची निर्मिती करून हे पर्यावरणपूरक इंधन ते वाहनधारकांना विकतील.’ राज्यातील आघाडी सरकारचा समाचार घेताना ते म्हणाले, ‘सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला मागे ढकलले आहे. बाकीचे सगळे भ्रष्ट निघाले म्हणून पक्ष नेतृत्वाने त्यांना महाराष्ट्रात धाडले; पण ते निष्काम निघाले. सिंचन योजनांवर ७० हजार कोटी रुपये खर्च करूनही केवळ ०.१ टक्का सिंचन वाढले. मग हे ७० हजार कोटी गेले कुठे, याचे मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे,’ असेही त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

माजी मंत्री अजित घोरपडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कवठे महांकाळ येथे भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपत प्रवेश केला. या वेळी सर्वच नेत्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

डिपॉझिटचे पैसे कुटुंबासाठी ठेवा
आबा, तुम्ही राष्ट्रवादीचे तिकीट घेऊ नका. उगाच कशाला पाच हजार रुपयांचे डिपॉझिट वाया घालवता? ते पैसे पोराबाळांसाठी खर्च केले तर तेही खुश होतील,’’ असा उपरोधिक टोला भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आर. आर.पाटील यांना लगावला. यावर उपस्थित असलेल्या सर्वांनीच त्यांना जोरदार दाद दिली.

... तर आर. आर. पाटलांनाही पद्मश्री देईन
नितीन गडकरी यांनीही आर.आर. पाटील यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्म पुरस्कारांची निवड करण्यात लक्ष घाला, असे सांगितले आहे. त्यानुसार मी वेगवेगळ्या समाजघटकांचा पुरस्कारासाठी निवड करताना विचार केला. मात्र, एक विभाग राहून गेला. ‘वाचाळवीरां’नाही पद्म पुरस्कार देण्याचा विचार मी पुढील वेळी करीन आणि पहिला पुरस्कार तुमच्या बोलक्या पोपटाला देईन,’ अशी उपरोधिक टीका आर. आर. पाटील यांचे नाव घेता केली.