आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपशी काहीही संबंध नाही, शरद पवार यांचे मोदी भेटी संदर्भात स्पष्‍टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - ज्या राज्यांत भाजपचे सरकार आहे त्या राज्यांत नरेंद्र मोदींचा प्रभाव राहील. मात्र, देशाला स्थिर सरकारची आवश्यकता आहे, असे सांगत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपला भाजपशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण शनिवारी सातारा येथे दिले.
पवार म्हणाले, मंत्री म्हणून मला विविध राज्यांत जावे लागते. त्या वेळी मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आहे हे मी पाहत नाही. गुजरातेत गेल्यानंतर मोदींची भेट झाली. आमची राजकीय मते भिन्न असू शकतात; पण भेटायचे नाही एवढी अस्पृश्यता राजकारणात पाळू नये. माझी आणि मोदींची दिल्लीत गुप्त भेट झाल्याचे एका दैनिकात वाचले. त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडल्याचे मिश्कीलपणे त्यांनी सांगितले. आपचा कोणताही परिणाम निवडणुकांवर होणार नाही. जागा वाटपासंदर्भात 26-22 चा फॉर्म्युला कायम राहील. काही ठिकाणी जागा बदलाची शक्यता आहे आणि त्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच निवडणुकीत जागा लढवेल. याबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.
अतिरेकी बोलणे शहाणपणाचे नाही
इजलकरंजी येथील मुंडे यांनी केलेल्या टीकेवर पवार म्हणाले, मी आजवर 14 निवडणुका लढवल्या. माझा एकदाही पराभव झाला नाही. ज्यांनी हे विधान केले त्यांना आमच्या त्या वेळच्या एस. काँग्रेसच्या उमेदवाराने पराभूत केले होते. याचा विसर त्यांना पडलेला दिसतो, असे सांगत अतिरेकी बोलणे शहाणपणाचे नाही, असा टोला त्यांनी मुंडे यांचे नाव घेता लगावला.
जनतेच्या न्यायालयात यूपीएविरोधात आरोपपत्र
काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीवरील भ्रष्टाचाराचे आरोप तसेच देशभरातील जनतेच्या तक्रारी, मते एकत्र करून एक आरोपपत्र तयार करण्यात येणार आहे. ते जनतेच्याच न्यायालयात सादर करण्याचा प्रयोग देशाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा भाजपच्या माध्यमातून केला जाणार आहे. चार्जशीट समितीचे अध्यक्ष गोपीनाथ मुंडे यांनी ही माहिती शनिवारी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विविध समित्या स्थापन केल्या आहेत.
सत्यपाल सिंह संपर्कात : मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे मुंडेंनी या वेळी स्पष्ट केले. येत्या काही दिवसांत ते भाजपत प्रवेश करतील. सत्यपाल यांना उत्तर प्रदेशमधून लोकसभेचे तिकीटही देण्यात येणार असल्याचा विचार पक्षाकडून केला जात आहे, असे मुंडे म्हणाले.